टाटाचा प्रवास….My photographic journey with TATA MOTORS.

टाटा मोटर्स ह्या जगप्रसिद्ध आणि तितक्याच लोकप्रिय ब्रँड साठी काम करायला लागून ह्या वर्षी तब्बल २१ वर्ष झाली. मला अजूनही आठवतंय सुरवात झाली ती टाटा मोटर्सच्याच Magna नावाच्या एका सेडान कॅटॅगरीतल्या कारने. १९९९ सालतल्या एका संध्याकाळी मला FCB ULKA मधले Creative Director श्री.रवी मडकईर ह्यांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की पुण्याच्या टाटा मोटर्स प्लांट मधे एका नवीन कारच्या लाँच साठी फिल्म शूट होत आहे तेव्हा फिल्म शूट होत असतांना जमतील तसे कारचे शॉट्स घेऊन ठेवायचे आहेत. ही जबाबदारी किंवा ही Risk त्यांनी माझ्यावर सोपवली कारण पुढे जाऊन ते फोटो कुठल्याही कॅम्पेन साठी वापरण्यात येणार नव्हते.

मी खूप excited होतो. माझ्या साठी सर्वात exciting काय होतं तर मुंबईच्या बाहेर जाऊन शूट करायला मिळणं. झालं मी रात्री तातडीने दोन असिस्टंट्सना घेऊन पुणं गाठलं.

ऍड फिल्मचं सकाळचं शेड्यूल टाटा मोटर्सच्या पिंपरी प्लांट च्या समोर असलेल्या ‘लेक हाऊस’ च्या परिसरात होतं. टाटा कंपनीच्या पिंपरी प्लांटच्या चारशे ते साडे-चारशे एकराच्या त्या विस्तीर्ण प्रॉपर्टी मधे एक सुंदर भला मोठ्ठा असा मानवनिर्मित तलाव आहे, त्या तलावाच्या काठावर पसरलेल्या हिरव्यागार लॉन च्या मधे लेक हाऊस नावाचं हे व्ही.आय.पी गेस्ट हाऊस आणि शेजारीच श्री.रतन टाटांचा छोटासा बंगला देखील आहे.
फिल्म चा Crew लेक हाऊस च्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर कार चे रनिंग शॉट्स घेत होता. संध्याकाळच्या वेळी पण असेच काही रनिंग शॉट्स मेन प्लांट मध्ये असलेल्या टेस्ट ट्रॅक वर घेऊन त्यांचं पॅकअप झालं. खरं म्हणजे संपूर्ण दिवस त्या crew बरोबर फिरून देखिल मला मनासारखा एकही शॉट मिळाला नव्हता. संध्याकाळच्या लाइट मध्ये जेमतेम काही शॉट्स मिळालेले इतकंच पण त्या शॉट्सचा माझ्या पोर्टफोलिओच्या दृष्टिकोनातून काहीही अर्थ नव्हता. त्याच्या मागे अनेक कारणं होती, मुख्य म्हणजे एकतर मला कार शूट करायला वयक्तिक असा वेळच मिळाला नव्हता आणि कार शूट करण्याचं तितकंसं तांत्रिक ज्ञान पण त्यावेळी माझ्याजवळ नव्हतं. ह्या अनुभवावरून मला एक गोष्ट मात्र कळली की नुसती पॅशन महत्वाची नाही तर त्या बरोबर त्या गोष्टीचं शास्त्रशुध्द ज्ञानही तितकंच आवश्यक आहे.

खरं सांगायचं म्हणजे कुठलाही नवीन विषय शिकण्याची सुरवात ही त्या विषयातलं चांगलं बघण्या पासून होते. (अर्थात त्या विषया बद्दलची तीव्र इच्छा ही गोष्ट आधी येते). फोटोग्राफीची माझी सुरवातही मी बारावीत असल्यापासूनच झालेली. त्या वेळी ‘चंदेरी’ हे मराठी फिल्म मॅगझीन नुकतंच सुरु झालेलं. श्री. गौतम राजाध्यक्ष हे त्या मॅगझीन चे एडिटर होते. त्यातले फिल्म स्टार्सचे त्यांनी काढलेले ते अद्भुत फोटो बघून मी इतका भारावून जात असे की मी ते फोटो बघण्यातंच तासंतास घालवायचो…… आणि माझ्याकडे असलेल्या कॅमेरात (म्हणजे Yashika Elctro ३५ मधे) ते तसे सुंदर का येत नाहीत ह्या रुखरुखी किंवा बेचैनी मुळेच खरंतर मी फोटोग्राफी शिकलो. (Yashika Elctro ३५ हा एक रेंज फाईंडर प्रकारचा कॅमेरा आहे). पुढे जे.जे.मधे गेल्यावर मी फोटोग्राफीचा श्री गणेशा आदरणीय श्री.नीब्रे सरांकडे गिरवला. उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या महिनाभर चाललेल्या त्या फोटोग्राफी क्लास मधे माझी फोटोग्राफी विषयातली बरीचशी कोडी सुटली आणि त्या बरोबरच अनेक नवीन कोडी पडलीही. मग मी फोटोग्राफी विषयावरंचं मिळेल ते पुस्तक वाचायला सुरवात केली. जे.जे.ची लायब्ररी होतीच पण त्याच बरोबर PSI म्हणजेच Photographic Society of India तसेच British Council ची लायब्ररी देखील मी पालथी घातली. फोटोग्राफी विषयावरची अनेक पुस्तकं, मॅगझिन्स वाचली, बघितली आणि बरोबरीने अनेक प्रयोग देखील केले, सुदैवाने तेजल पटनी सारखे सिनिअर्स आम्हाला लाभल्या मुळे त्यांचे अतिशय मौलिक असे मार्गदर्शन ही वेळोवेळी मिळत गेले. किती रोल्स आणि प्रिंट्स फुकट गेल्या असतील त्याचा काही हिशोबच नाही, अनेक वर्कशॉप्स अटेंड केले, फोटोग्राफेर्सना असिस्ट केलं. थोडक्यात काय तर मिळेल तिथून ज्ञान संपादन करण्याचा जणू चंगचं बांधला. आणि महत्वाचं म्हणजे आपण मुद्दाम काही करतोय असं कधीच वाटलं नाही…
बस! ते Naturally तसं घडत गेलं.

असो…… तर टाटा मोटर्सच्या MAGNA कार च्या त्या शूट नंतर ऑटोमोबाईल फोटोग्राफीचा आता प्रॅक्टटीकली अभ्यास करणं आवश्यक होतं आणि ते देखील DIY म्हणजेच Do It Yourself पद्धतीने.
फोटोग्राफी हे माध्यमच मुळात महाग त्यात पुन्हा ऑटोमोबाईल फोटोग्राफी अजून खर्चिक. त्यामुळे ह्या जॉनर मधलं स्पेशलायझेशन एक वेगळंच आव्हान होतं. मुख्य गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस साठी लागणारा कच्चा माल….. कच्चा माल म्हणजे simply नवी कोरी करकरीत कार. आता ती कुठून मिळणार? पण सुदैवाने माझ्या पुढचा हा जटील प्रश्न माझ्या मित्रांनीच सोडवला. सुरवात झाली ते परेश ने घेतलेल्या Yamaha Enticer ह्या byke च्या शूट ने मग महेश नाईक ची Maruti Alto झाली… नंतर मग शूट केली ती मंदार ची FIAT Siena. म्हणजे थोडक्यात असं झालं की कोणी मित्राने नवीन गाडी घेतली रे घेतली की मी त्यावर माझी ऑटोमोबाईल फोटोग्राफीची तहान भागवत असे.
सुरवात अर्थातच आऊटडोअर लोकेशन्सवर शूट करण्या पासून केली. बहुतेक वेळेला लोकेशन असायचं डोंबिवली जवळंच भोपर हे गाव. आता डोंबिवली शहराने त्या गावाला पुरतं गिळून टाकलंय. ५० एक घरांची वस्ती असलेलं भोपर डोंबिवलीला लागूनच असलेलं एक छोटंसं टुमदार गाव. तेथील रहिवाशांचा मुख्य व्यवसाय भात शेती. भोपर गावाला सौंदर्याचं जणू वरदानच होत. गावातली ६० टक्के जमीन भात शेती ने व्यापलेली, त्या शेतां मधूनच नागमोडी वळणं घेत जाणारा एक रस्ता होता तो गावा बाहेर असलेल्या एका टेकडी पर्यंत जाऊन संपायचा. त्या टेकडीवर गणपतीचं एक छोटंसं देऊळ होतं, आणि त्या टेकडीचा आजूबाजूचा परिसर अशाच अनेक छोट्या मोठ्या टेकड्यानी व्यापलेला होता. बाराही महिने ह्या सर्व टेकड्या तलम अशा गवताने व्यापलेला असायच्या. उन्हाळ्यात हे गवत वाळायचं आणि तो संपूर्ण परिसर अक्षरशः सोनेरी होऊन जायचा. त्या लोकेशन्स वरती मी असंख्य शूट्स केलेली आहेत. आणि ऑटोमोबाईल शूट्स साठी पण ह्या पेक्षा सुंदर लोकेशन शोधून सापडणार नव्हतं. त्या दरम्यान मी फोटोशॉपही शिकत असल्यामुळे सोबत बरोबरीने एडिटिंगची प्रॅक्टिस पण होत होती.

परेश ची Yamaha Entiser.भोपर गावात ह्याच गाडीपासून मी ऑटोमोबाईल फोटोग्राफी ची प्रॅक्टिस सुरु केली.

सांगायचंय काय तर मी शूट केलेल्या ह्या दोन-तीन गाड्यांच्या फोटोंच्या मालमत्तेवर मी ऑटोमोबाईल फोटोग्राफी ह्या अत्यंत नवख्या शाखे मध्ये चंचू प्रवेश करू पाहत होतो. जिथे वर्षानुवर्षे आपले पाय घट्ट रोवून बसलेल्या आणि तितक्याच दिग्गज अशा फोटोग्राफेर्सचा दबदबा होता. ह्या सगळ्या दिग्गज्जां समोर टिकणं किंवा आपलं स्थान तयार करणं ही तर खूप दूरची गोष्ट होती. पहिलत्यांदी सराव घडणं महत्वाचं होतं. तो स्वतःच्या पैशातून वारंवार करणं खरंतर खूपच खर्चिक पण सुदैवाने मला अशा बऱ्याच संधी मिळत गेल्या ज्यांमुळे मी ऑटोमोबाईल फोटोग्राफी साठी लागणारी skills वेळोवेळी sharpen करू शकलो ……

माझ्या ह्या तुटपुंज्या पोर्टफोलिओ वर माझ्या साठी अशीच एक संधी पुन्हा चालून आली ती Rediffusion च्या
श्री. दिलीप मराठे आणि गौरव लालवानी ह्यांचा मुळे. ह्या वेळी देखील क्लायंट होता टाटा मोटर्सच. टाटा मोटर्सच्या 207-DI ह्या Pick Up Vehicle साठी एक मोट्टी ऍड फिल्म तयार होत होती. ही फिल्म भारतातल्या वेगवेगळ्या लोकेशन्स वर शूट होणार होती आणि श्री.सुजित सरकार हे त्या Ad फिल्म चे दिग्दर्शक होते. (सुजित सरकार ह्यांनी आत्ता पर्यंत विकी डोनर, पिकू किंवा Pink ह्या सारखे अनेक दर्जेदार चित्रपटांच दिग्दर्शन केलेले आहे. )
खरंतर ऍड फिल्म बरोबर शूट करण्याचा एक मोठ्ठा ड्रॉबॅक असा असतो की तुम्हाला Exclusively शूट करण्यासाठी फारच कमी वेळा संधी मिळते आणि जरी का ती तशी मिळाली तरीही शूट साठी फारच थोडा वेळ मिळतो. ह्याचं मुख्य कारण म्हणजे कार चे Pack shots म्हणजेच कार चे Individual हिरो शॉट्स mostly सकाळच्या किंवा संध्याकाळच्या संधी प्रकाशात घ्यावे लागतात. २० ते ३० मिनिटंच टिकणाऱ्या ह्या वेळेला
‘ गोल्डन मोमेन्ट ‘ किंवा ‘Magic moment’ असं म्हणतात आणि ती मोमेन्ट एकदा का गेली की मग कितीही जरी प्रयत्न केले तरी कारचे फोटो चांगले येत नाही. अशा वेळी कोणताही फिल्म डायरेक्टर naturally सर्वात प्रथम त्याच्या स्क्रिप्टच्या अनुसार जसे शॉट्स असतील तसे आधी पूर्ण करतो आणि त्यातून जर का वेळ असेल किंवा त्यानंतर जर का त्या गाडीचा कुठलाही संलग्न शॉट नसेल तर मगच Still फोटोग्राफरला संधी मिळते. माझ्या सुदैवाने मला सुजित सरकार ह्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आणि त्यामुळे exclusive शूट साठी मला बऱ्यापैकी वेळ मिळाला. (बऱ्याच वेळेला ते स्वतः येऊन शॉट व्यवस्थित मिळाला का अशी चौकशी देखील करीत)
त्या शूट दरम्यान आम्ही खूप फिरलो. जयपूर जवळील सॉल्ट लेक, कांगडा व्हॅली मधले चहाचे मळे, हिमाचल प्रदेशातील ‘ धरमशाला ‘ ह्या आणि अशा सर्व ठिकाणां मधल्या सुंदर landscapesच्या बॅकग्राऊंड्स वर ती संपूर्ण फिल्म शूट झालेली. शेवटच्या दिवशी धरमशाला ला तर चक्क ती गाडी आणि एक ड्राइवर मला दिला आणि सांगितलं तू दिवस भर हवं तिथे जा आणि पाहिजे त्या लोकेशन्स वर ती गाडी शूट कर, संपूर्ण फिल्म च्या Crew चं धरमशाला मधलं pack up झालेलं आणि ते सर्व जण मुंबईस रवाना झालेले. उरलो फक्त आम्ही दोघचं म्हणजे माझा छोटासा crew आणि Red कलरची ती गाडी.

झालं दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही गाडी घेऊन निघालो. कोणताही Creative Director सोबत नसताना कितीही freedom जरी असला तरीही ह्या संधी बरोबरच एक मोट्ठी जबाबदारीही माझ्या वर होती पण अशा वेळीच तर तुमची खरी परीक्षा असते. मी आमच्या ड्रायव्हरला माझ्या डोक्यातल्या कल्पना सांगितल्या आणि त्याने पण खूप उत्साहाने मला साथ दिली. पूर्ण दिवस म्हणजे संध्याकाळ होई पर्यंत आम्ही बऱ्याच लोकेशन्स वर जाऊन ती गाडी शूट केली. खूप मजा आली आणि खूप शिकायलाही मिळालं.

धरमशाला मधल्या एका नयनरम्य बॅकग्राऊंड वर TATA 207 DI

गेल्या २० वर्षांमध्ये अनेक शूट्स केली, प्रत्येक शूट काहीतरी शिकवून जात असे. Outdoor light मधे गाडी शूट करण्यासाठी खूप वेगळी challenges असतात आणि Indoor म्हणजेच एखाद्या स्टुडिओत गाडी शूट करण्यासाठी पुन्हा वेगळी challenges! स्टुडिओ मधे आभासी आकाश निर्माण करण्यासाठी अपार कष्ट, वेळ आणि तेवढाच पैसा देखील लागतो. ह्या सर्व कसरती करून जेव्हा मनासारखा result मिळतो तो क्षण खऱ्या समाधानाचा!

टाटा बरोबरच महिंद्रा ह्या ऑटोमोबाईल कंपनी साठी काम करण्याची संधी पण मला मिळाली. महिद्रा ऑटोमोबाईलचा ट्रॅक्टर, तसंच महिंद्रा स्कॉर्पिओ, स्कॉर्पिओ Gate Away, लोगान अशा अनेक गाड्या शूट केल्या.
टाटाच्या Magna कार पासून सुरु झालेल्या हा प्रवास चालूच आहे. ह्या दरम्यान टाटाच्या Commercial segment मधल्या बहुतेक गाड्यांचे फोटो मी काढले. ह्या वर्षीच्या म्हणजेच फेब्रुवारी २०२० मधे दिल्लीत पार पडलेल्या Auto Expo साठी जानेवारी २०२० महिन्यात काही खास गाड्या शूट केल्या
त्यात face lift केलेली Yodha, टाटा Ultra ह्या गाडीचं EV म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्हर्जन, TATA च्या Commercial सेगमेंट मधला सर्वात शक्तिशाली आणि तितक्याच सुंदर दिसणाऱ्या Prima ट्रक चा अजस्त्र Tipper अशा एका पेक्षा एक सुंदर गाड्या मी ह्या वर्षी शूट केल्या.

TATA MOTORS ची डिफेन्स Vehicle. लोकेशन – पुणे

TATA MOTORS च्या PRIMA रेंज मधला एक ट्रक. शक्तिशाली आणि तितकाच सुंदर! शूट लोकेशन – TATA चा पुणे प्लांट. फोटोशॉप ची करामत करतांना ३ वेगवेगळे फोटोस मर्ज करून हा effect साधलाय

Star Bus. Shoot Location -धारवाड
Star Bus_Hybrid.

TATA WINGER


TATA ची अल्ट्रा इलेक्ट्रिक बस. Designed by TATA built by DC (Deelip Chabriya)

Mahindra’s Scorpio GateAway. Exclusively Designed by Mahindra for Bhaichung Bhutia

Interior shoot for a 41 seater AC Star Bus.

Truck rainge shot at Jamshedpur plant. त्या मागच लडाख मधलं Landscape देखील मीच शूट केलंय. हे दोन्ही फोटो फोटोशॉपवर मर्ज करण्याची करामत मात्र एडिटिंग आर्टिस्ट ची…..

All new Yodha, exclusively shot for Auto Expo 2020 launch.

Beautiful yet very powerful Intra V30

Massive Prima 3530 Tipper.

२० वर्षांच्या ह्या रोमहर्षक प्रवासात अनेक लोकांचं सहकार्य मला लाभलं किंबहुना त्यांच्या शिवाय खरंतर हे केवळ अशक्यच होतं. त्यात Ad Agencies आणि TATA MOTORS मधले माझे सर्व मित्र आणि हितचिंतक तर आहेतच पण त्यांच्या सोबत होते माझ्या सर्व shoots च्या Production ची धुरा सांभाळणारे Production Managers, माझ्या फोटोंना किंबहुना त्यासाठी कष्ट केलेल्या प्रत्येकाच्या प्रयत्नांना फोटोशॉप च्या माध्यमातून न्याय देणारे माझे सर्व एडिटर्स किंवा Retoucher मित्रं, टाटाच्या विविध प्लांट मधे ज्यांच वेळोवेळी सहकार्य लाभलं असे प्लांट मॅनेजर्स, Lighting हा अत्यंत महत्वाचा भाग सांभाळणारे Gaffers, Light men, तसंच स्पॉट बॉइज, कार पॉलिशर्स, ड्रायव्हर्स अशी किती तरी लोकं आहेत ज्यांच्या मुळे हा प्रवास गेली कित्येक वर्ष आनंदाचा होत आहे. आभार प्रदर्शनाची ही खरंतर वेळ नाही कारण …..
शो तो अभी बाकी है मेरे दोस्त….. 😁

राजेश जोशी फोटोग्राफी
फेब्रुवारी २०२०
www.rajeshjoshi.com
9820147465 / 022 – 25899162