सतारीचे सूर मला नेहमीच एक चैतन्यमय अनुभव देतात, जसं सरोद ह्या वाद्याचे सूर कुठल्यातरी धीरगंभीर अशा अवस्थेत घेऊन जातात आणि बासरीचे सूर मनाला एक दैवी शांतता देतात. शब्दात वर्णन न करता येणाऱ्या मनाच्या ह्या अमूर्त अशा काही अवस्था ज्या तुम्ही फक्त आणि फ़क्त अनुभवूच शकता. जे.जे.ला असतांना मी शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफिली अनुभवल्या आणि छायाचित्रित देखिल केल्या. असंच २००१ मधे पंडीत रवी शंकरजी आणि त्यांची सुकन्या अनुष्का शंकर ह्यांच्या एका कॉन्सर्टला जाण्याचा मला योग आला. एकमेवाद्वितीय असा हा कॉन्सर्ट सायनच्या षङमुखानंद हॉल मधे झाला होता. कॉन्सर्टची सुरुवात सुंदर अशा कुठल्याशा एका रागाच्या आलापीने झाली. साधारण अर्धा ते पाऊण तास तबल्याच्या साथी विना चाललेल्या सतारीच्याच्या त्या दिव्य सुरांनी मी अक्षरशः न्हाऊन निघालेलो. मग तबल्याच्या साथीने मैफिलीत हळू हळू रंग भरायला सुरवात केली. पण माझ्यातला फोटोग्राफर मला काही स्वस्थ बसून देईना आणि मग नेहमीच्या सवयी प्रमाणे मी कॅमेरा घेऊन स्टेज पाशी गेलो आणि कॉन्सर्ट ऐकता ऐकता त्या दोघांचे काही ब्लॅक & व्हाईट फोटोज क्लिक केले. मी जेमतेम एखादा रोल शूट केला असेल मग मात्र मी फोटोग्राफी थांबवली आणि माझ्या सीट वर बसून निमूटपणे तो कॉन्सर्ट ऐकला. पुढचे काही दिवस सतारीचे ते स्वर्गीय सूर कानात अक्षरशः रुंजी घालत होते.

ह्या गोष्टीला एखादं वर्ष झालं असेल आणि एके दिवशी फेमिना मॅगझीन ची सब एडिटर आणि माझी कलिग रुचिरा बोस हिचा मला फोन आला,” राजेश, एका सेलेब्रिटी शूट साठी तू फ्री आहेस का? अनुष्का शंकर बरोबर उद्या शूट आहे, सकाळी ११ ची वेळ तिने दिली आहे. शूट सांताक्रूज मधल्या Grand Hyatt हॉटेलात आहे. अनुष्का शंकर म्हटल्यावरच पुढचं एकही वाक्य नं ऐकता मी माझा होकार कळवला. अनुष्का शंकर सारख्या इतक्या मोठ्या कलाकाराला शूट करायची संधी मिळाल्यावर भारावून जाणं सहाजिकच होतं पण सेलेब्रिटी शूट ही मला नेहमीच एक मोठी जबाबदारी वाटत आली आहे ह्याचं मुख्य कारण म्हणजे बहुतांशी सेलिब्रिटी शूट्स साठी अतिशय थोडा वेळ दिला जातो आणि मिळालेल्या त्या अर्धा-पाऊण तासात तुम्हाला तुमचं बेस्ट output द्यायचं असतं.

असो ! तर Hyatt हॉटेलच्या एका private लॉबी मधे आम्हाला शूटच लोकेशन म्हणून जागा दिलेली. वेळ मर्यादित असल्याने अनुष्का येई पर्यंत मी lights सेट-अप करायला सुरवात केली. लॉबीच्या एका अँगल मधून दिसणाऱ्या आणि भिंती वर लटकवलेल्या सुप्रसिद्ध पेंटर रझा ह्यांच्या एका पेटिंगच्या बॅकग्राऊंडला मी अनुष्काला फोटोग्राफ करायचं ठरवल. ह्याचं कारण त्या पेन्टिंग मधला geometric पॅटर्न अनुष्काच्या त्या पोर्ट्रेटला सपोर्ट करेल ह्याची मला खात्री होती. दुसरं म्हणजे कॅमेराच्या उजव्या बाजूला असलेल्या प्रशस्थ खिडकीतून येणारा परावर्तित प्रकाश (Reflected light) त्या फोटोचा key light म्हणून अतिशय योग्य ठरणार होता. पण तो reflected light असल्याने फोटोग्राफी च्या नियमानुसार खूपच low होता त्यामुळेच मग मी त्याच दिशेने एक flash light as a key light म्हणून सेट केला. आणि फील-इन light म्हणून कॅमेरा च्या बाजूने दुसरा एक light सेट केला.

पुढच्या दोन मिनिटातच अनुष्का लोकेशन वर पोहोचली. सतारीच्या दिव्य स्वरां इतकंच तीच ते charismatic सौदर्य कुणालाही मोहून टाकल्या शिवाय राहत नाही. गडद राखाडी कलरच्या Bell bottom pants वर वेल्वेट मटेरियलचा Deep ‘V’ neck असलेला simple असा एक टॉप तिने परिधान केलेला. गळ्यात हिरेजडित अतिशय नाजूक असं एक पेंडन्ट….. मेकअप म्हणजे पण फक्त skin color ची एक लिपस्टिक बस्स! मी भारावून तिच्याकडे बघत असतांनाच रुचिराने अनुष्का बरोबर माझी ओळख करून दिली. पहिल्यांदा मी अनुष्काला आम्ही set up केलेल्या lights बद्दल थोडक्यात brief केलं. मग तिच्या साठी दिलेल्या mark वर ती उभी राहिली आणि मी lightचं reading वगैरे घेऊन पहिली Polaroid शूट केली. Polaroid हातात आल्या क्षणी मला जाणवलं की ह्या फोटोत काहीतरी missing आहे म्हणून. तसं बघितलं तर exposure वगैरे सर्व ठीक होतं पण तरीही काहीतरी missing वाटत होतं. थोडा वेळ डोकं खाजवल्यावर चटकन ती missing गोष्ट काय होती ते माझ्या लक्षात आलं. विशेष काही नाही…. मला फक्त एक back light add करायची गरज होती.

असं काय चमत्कार करणार होता हा तिसरा light म्हणजेच तो back light? तर तो तिसरा light तिच्या सुंदर कुरळ्या केसांना background मधे मर्ज होण्या पासून वाचवणार होता, आणि निव्वळ त्या तिसऱ्या light च्या addition मुळेच तीची identity अजूनंच खुलून दिसणार होती. कारण अनुष्का शंकर ची identity ही जितकी तिच्या निखळ smile मध्ये आहे तितकीच ती तिच्या सुंदर कुरळ्या केसां मधे आहे.

मग एकाही क्षणाचा विलंब न करता मी तो तिसरा light म्हणजेच तो back light add केला….आणि हवा त्या resultनिशी पुढच्या २० एक मिनिटांत शूट pack up देखील केलं. शूट दिलेल्या वेळेच्या अगोदरच संपलेलं.
तीला मग मी २००१ मधले काढलेले त्या कॉन्सर्टचे फोटोज दाखवले. आश्चर्य मिश्रित आनंदाने तीने ते फोटो बघितले. जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाल्या मुळे तिला विशेष आनंद झालेला.

असो!……तर पोर्ट्रेट फोटोग्राफी हा विषय म्हटलं तर अतिशय सोपा आणि म्हटलं तर अतिशय कठीण. इथे तुमच्यातल्या फोटोग्राफी skills बरोबरच आवश्यक असते ती तुमची निरीक्षण शक्ती, सृजनशीलता आणि महत्वाचं म्हणजे तुमच्यात असलेला सौदर्यात्मक दृष्टिकोन. माझ्या मते अनुष्का शंकरच्या ह्या फोटोशूट मध्ये तिच्या चेहऱ्या मधली सौदर्य स्थळं मला जाणवण्या मागे थोडं intuition असेल आणि थोडा अनुभव……

ग्रासहॉप्पर राजेश जोशी
२५ मार्च २०२०

अनुष्काच्या शूट च्या वेळी केलेल्या Lighting ची रचना दाखवणारा प्लॅन.