माझ्या-करियरची-टेप- rajesh joshi
-१-
प्री करियलायझेशन! १९९४.

लहानपणा पासून चित्रकला चांगली असल्याने आर्ट फील्ड मधेच काहीतरी करणार हे निश्चित होतं पण commercial artist आणि त्याही पुढे जाऊन फोटोग्राफर होईन असं आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं. खरं सांगायचं तर मला आर्किटेक्ट व्हायचं होतं पण १२वी सायन्सला मार्कांनी चांगलाच दगा दिला आणि करियरची गाडी कंमर्शियल आर्ट कडे वळली. अर्थात आर्किटेक्चर हा विषय अजूनही आवडतो पण adverting आणि फाइन आर्ट हे विषय देखील तितकेच प्रिय आहेत. सर जे जे इन्स्टिट्युट मधे Applied Art ला म्हणजेच उपयोजित कला ह्या शाखेत प्रवेश मिळाला. रीतसर कॉलेज चालू झालं आणि नंतर काही दिवसांत फाइन आर्टस् म्हणजेच school of Art मधलं वातावरण बघून इतका भारावून गेलो की मी पेन्टिंगलाच जायला पाहिजे होतं असं वाटू लागलं. पण सेकंड ईयर च्या मे महिन्याच्या सुट्टीत कुतूहल म्हणून डोंबिवलीला श्री.निब्रे सरांकडे फोटोग्राफी शिकायला गेलो आणि करियरचा रस्ता जो बदलला तो बदलालाच.
प्रत्येक कलाकार मग तो पेंटर असो किंवा आर्किटेक्ट अथवा एखादा कवी असो की लेखक शेवटी प्रत्येक जण आपापल्या माध्यमातून स्टोरीच सांगत असतो. अर्थात आपण काम करतो त्या मध्यमा द्वारे स्टोरी सांगणं इतकी पातळी गाठे पर्यंत कधी कधी पूर्ण आयुष्यही कामी येवू शकतं. त्यामुळे कुठल्याही करियर ची सुरवात होते ती त्या माध्यमाला पूर्ण पणे समजून घेण्या पासूनच आणि माझ्या मते त्यालाच ‘स्ट्रगल’ म्हणतात.
असो! तर सर जे जे इन्स्टिट्युट ऑफ अप्लाइड आर्टस मधून १९९४ ला BFA ही पदवी घेऊन पास आऊट झालो आणि फायनली एक फोटोग्राफर म्हणून माझ्या करियरची सुरवात केली. मुखपृष्ठावर छायाचित्रित केलेल्या माझ्या सर्व व्हिजीटींग कार्ड्स च्या designs प्रमाणेच मी आणि माझे कलेबद्दलचे विचार हळू हळू बदलत गेले. माझ्या मते Sensitivity तीच असली तरी sensibility मात्र थोड्याफार प्रमाणात बदलली आहे. प्रेस फोटोग्राफर ते स्वतंत्र फोटोग्राफर (Freelance Photographer) असा माझा प्रवास झाला. माझ्या करियरची सुरवात Gentleman नावाच्या एका लाइफ स्टाइल मॅगझिन मधून एक ‘प्रेस फोटोग्राफर’ म्हणून झाली. Gentleman हे त्या काळातलं नावाजलेलं असं एक लाइफ स्टाइल आणि फॅशन मॅगझिन होतं. त्यामुळे सुरवातीलाच मला खूप मोठ्या मोठ्या लोकांना भेटायचा आणि मुख्य म्हणजे त्यांच्या बरोबर फोटोशूट करायचा चान्स मिळाला. ह्या प्रवासात मला आलेल्या कडू गोड अनुभवांचा हा एक छोटासा संग्रह.
२५ वर्षांच्या ह्या प्रवासात अनेक लोकांचं सहकार्य मिळालं पण एक आर्टिस्ट म्हणून किंवा एक professional म्हणून जो काही प्रवास घडला तो प्रत्येकाला आपला आपणंच करायचा असतो. प्रवासात असंख्य चुका घडल्या. कधी त्यातून शिकलो कधी कधी शिकायला थोडा वेळ लागला. फिल्म ते डिजिटल असा हा प्रवास मला खूप काही शिकवून गेला. अर्थात हा प्रवास आणि रोज काहीतरी नविन शिकणं ह्या दोन्हीही गोष्टी आजही चालूच आहेत.
पहिलं अपयश ही यशाची पहिली पायरी असते पण म्हणून काय शंभरावं अपयश ही यशाची शंभरावी पायरी असतेच असं नाही. त्यामुळे कर्मण्ये वाधिकारस्ते ह्या श्लोका मध्ये सांगितल्या प्रमाणे फळाची अपेक्षा नं करता आपलं काम नियमीत पणे करंत राहणे हेच सर्वात उत्तम. कोणीतरी म्हणून गेलं आहे की, “आयुष्याला seriously घेऊ नका पण sincerely जरूर घ्या.
इतकी वर्ष basically तोच प्रयन्त चालू आहे !

ग्रासहॉपर राजेश जोशी / जुलै २०२०

-२-
करियर एक चिंतन !

“आयुष्यात मागे वळून बघताना” अशी सुरवात करण्याइतकं माझं वय नक्कीच झालं नाहीये पण परवा सहज मोजलं आणि लक्षात आलं की ह्या वर्षी माझ्या करिअरला तब्बल २५ वर्ष पूर्ण होत आहेत. फायनल इयर च्या Annual प्रोजेक्टला ५-६ awards आणि फर्स्ट क्लास घेऊन १९९४ ला जे जे मधून बाहेर पडलो आणि माझं प्रोजेक्ट डिस्प्ले वरून उतरवल्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या हातात जॉब ही होता. त्या वयात छाती फुगायला इतकं कारण देखील पुरेसं असतं. महिना २००० रुपये पगार असलेली Nucleus Advertising मधील माझी पहिली नोकरी internship स्वरूपाची असल्याने पुढ ती जेमतेम दोन ते तीन महिने टिकली. Nucleus जाहिरात कंपनीचे फॉऊंडर आणि आयुष्यातले माझे पहिले बॉस श्री.रफिक एलियस हे advertising क्षेत्रातलं एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आहे. रफिक सर हे एक निष्णात फोटोग्राफर तर आहेतच पण तितकेच ते एक उत्कृष्ट कॉपी रायटर म्हणूनही प्रसिद्ध होते. BENZER ह्या त्यांच्या मुख्य क्लायंट साठी त्यांनी केलेल्या ads आणि catalogues ना अनेक राष्ट्रीय आणि आतंराष्ट्रीय अवॉर्ड्स मिळाली होती. पण आजही ते माझ्या लक्षात आहेत ते एक अतिशय चांगला माणूस म्हणूनच. त्यांच्या बरोबरच्या त्या दोन-तीन महिन्यांच्या सहवासात माझा एकंदरीतच फोटोग्राफीकडे असलेला कल बघून त्यांनी अगदी मित्रत्वाच्या नात्याने मला सल्ला दिला होता, की राजेश design क्षेत्रात म्हणजेच एखाद्या ad agency मधे वेळ घालवण्या पेक्षा फोटोग्राफी वरच फोकस कर कुठल्यातरी फोटोग्राफर ला assist कर आणि मग थोड्या दिवसांनी freelancing चालू कर. ३-४ महिन्यांत Nucleus सोडली त्या दिवसापासूनच खरंतर करियरची खरी वाटचाल चालू झाली.
कॉलेज सोडतांना आपण कोणीतरी आहोत हा स्वतःबद्दल असलेला माझा गैरसमज पुढच्या दोनतीन महिन्यातच नाहीसा झाला. रफिक सरांनी सांगितल्या प्रमाणे एका अत्यंत नावाजलेल्या फोटोग्राफरला assist केलंही पण मोजून एक दिवसासाठीच. एका दिवसातल्या त्या काही तासांतच मला कळलं की Assistant ship चं हे गणित आपल्याला जमणारं नाही. मला पहिल्या पासूनच स्वतंत्र पणे काम करायला जास्त आवडे त्यामुळेच assistant गीरी करण्या पेक्षा स्वतंत्रपणे काम करण्यासाठी कुठला पर्याय आहे का? नेमका ह्याच गोष्टीच्या मी शोध घेत असतांना मला माझ्या एका मित्रा कडून एका lifestyle मॅगझिनचा reference मिळाला आणि तिथे एका In-house फोटोग्राफर ची जागा रिकामी असल्याचं कळलं. गम्मत म्हणजे पुढच्या १-२ आठवड्यातच मी चक्क त्या लाइफ स्टाइल मॅगझिनचा स्टाफ फोटोग्राफर म्हणून जॉईनही झालो.
कुठल्याही मेंटॉर शिवाय सुरु झालेला हा प्रवास अर्थातच अनेक नागमोडी वळणांनी आणि चढ उतारांनी भरलेला होता. त्यामुळे स्वानुभावातूनंच घडंत घडंत, वाटेत भेटलेल्या अनेक भल्या बुऱ्या माणसांकडून शिकंत success नावाच्या मृगजळाकडे वाटचाल करतांना मला ते आजही मिळालंय असं वाटत नाही.
असो! तर Success ह्या संकल्पने बद्दल अनेक व्याख्या आणि अनेक दृष्टिकोन आहेत. माझ्या मते आपण जेव्हा आपलं success दुसऱ्या कुणाच्या success बरोबर compare करतो तेव्हा त्याचं कमी जास्ती असं मूल्यमापन होणारंच. पण इतक्या वर्षांच्या अनुभवांनंतर मला जेन्युइनली असं वाटतं की खरी स्पर्धा ही नेहमीच आपल्या स्वतःशीच हवी अर्थात जगात काय चाललंय ह्याचं पूर्णपणे भान ठेवूनच. कलेमध्ये आपला सूर, आपली style आपल्याला सापडणं खूप महत्वाचं असतं पण त्यासाठी किती वर्ष लागतील ह्याचा काहीही नेम नसतो. महत्वाचं काय असतं तर इतक्या मेहेनतीनंतर एक कलाकार म्हणून तुमची किती ग्रोथ झाली हे. यश, पैसा आणि कीर्ती ह्या गोष्टी कधी मिळतील आणि कधी हातातून निसटतील ह्याचा काहीही नेम नाही त्यामुळे जो पर्यंत मी स्वतःशी जिंकत नाही तो पर्यंत ही स्पर्धा संपलीच नाही हा attitude ठेवणं कधीही जास्त चांगलं असं वाटतं मला.
असो! थोडं विषयांतर झालं तरीही आजपर्यंतच्या माझ्या अनुभवांच्या ह्या पुस्तकामध्ये काही अशी पानं आहेत की जी माझ्या इवल्याश्या आयुष्याच्या संदर्भात विचार केला तर अगदी ती जरी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी अशी नसली तरीही जतन करून ठेवण्या इतपत नक्कीच आहेत. तर मंडळी त्यातल्याच काही glossy पानांचा हा छोटासा संग्रह.

-३-
Best Wishes from शम्मी कपूर

साधारण १९९४ च्या ऑक्टोबर महिन्यात मी Gentleman नावाच्या एका Life Style आणि fashion मॅगझीन साठी काम करायला सुरवात केली. आयुष्यातला हा दुसरा जॉब असला तरीही एक फोटोग्राफर म्हणून पहिलाच. आत्ता पर्यंतच्या कॉलेजिय जीवनात स्वतःसाठीच काम करण्याची सवय असल्याने दुसऱ्या कोणा साठी काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ. त्यामुळे पहिले तीन ते चार महिने तर मॅगझिनच्या एडिटर साहेबांच्या अपेक्षा समजून घेता घेताच गेले आणि त्याआधीच आमच्या एडिटरने माझ्या हातात सोडचिट्ठी ठेवली (ढुंगणावर लाथ मारली म्हणणं नाही म्हटलं तरी अजूनही थोडं जडंच जातं). पण त्या दोन तीन महिन्यात मी सिने आणि कला क्षेत्रातल्या माझ्या अतिशय लाडक्या अशा काही व्यक्तींना भेटलो आणि चक्क त्यांचं फोटो शूटही केलं.
त्यात सर्वात पहिले होते ते हिंदी फिल्म इंडस्ट्री मधले माझे अतिशय लाडके श्री. शम्मी कपूर आणि श्री. शशी कपूर. शम्मीजींच्या खानदानी रूपा बरोबरच ते अजूनही लक्षात आहेत ते त्यांच्या नाचण्याच्या विशिष्ठ अशा style मुळे. त्यांचे जंगली, ब्रह्मचारी, प्रिन्स, जानवर, An Evening in Paris असे अनेक चित्रपट बघून मी त्यावेळी भारावून गेलो होतो आणि आश्चर्य म्हणजे ते सर्व चित्रपट आजही मला तितकेच आवडतात. त्यांच्यावर चित्रित झालेली आणि मोहम्मद रफी साहेबांनी गायलेली अनेक गाणी हे देखील त्या मागचं एक कारण नक्कीच आहे. श्री. शशी कपूर ह्यांचे चित्रपट मी फार जरी बघितले नसले तरीही त्यांची ती स्टयलिश image, खळ्या पडणारं त्यांचं ते smile ह्या गोष्टींचा मी आजही fan आहे.
माझ्या जॉबचा १५ वा दिवस असेल. फिरोझा नामक आमच्या एका पारशी sub एडिटरीण बाईंनी मला अगदी casually सांगितलं की कल हमें शम्मी कपूर और शशी कपूर के साथ शूट करना है। आयुष्यातलं माझं हे पहिलं सेलिब्रिटी शूट आणि ते देखील माझ्या इतक्या आवडत्या कलाकारांसोबत, OMG! (ओह माय गणपती!) माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. हे surprise पण इतक्या suddenly आलं की मला तर पुरतं excite व्हायला देखील वेळ मिळाला नाही. फोटो शूट साठी आम्ही श्री. शम्मी कपूर ह्यांच्या मलबारहील वरील बंगल्यावर जाणार होतो.
दुर्दैवाने आज माझ्याकडे त्या शूटचा एकही फोटो नाही पण त्या दिवशीची एक मजेशीर आठवण आजही माझ्या चांगली लक्षात आहे. ती म्हणजे त्यांचा interview चालू असतांना चहा सोबत सर्व्ह केले गेलेले अनेक पदार्थ.
म्हणजे त्याचं काय झालं की शूट साठी मी lights वगैरे सेट करून त्या दोघांचा interview बघत बाजूच्याच एका सोफ्यावर गुपचूप बसलो होतो. तितक्यात शम्मीजींच्या पत्नी आतून चहाची एक ट्रॉली घेऊन बाहेर आल्या. मग सर्वांना हाय हॅल्लो करून अतिशय सुबक अशा चहाच्या कपांमध्ये चहा ओतत आणि चीनी कितनी वगैरे विचारत असतांनाच आतून अजून दोन नोकर आणखीन दोन ट्रॉल्या घेऊन बाहेर आले. त्या दोन्हीही ट्रॉल्या त्यावर आकर्षक पणे मांडलेल्या नानाविध प्रकारच्या पदार्थांनी अक्षरशः ओसंडत होत्या. कुकीज, दोन-तीन प्रकारची बिस्किटं, विविध प्रकारची ड्रायफ्रुटस, तीन चार प्रकारचे नमकीन items, विविध पेस्टरिज आणि कमीतकमी चार ते पाच प्रकारची सँडविचेस…….बापरे काय नव्हतं विचार त्यात ! ! !
आज आठवलं की हसू येतं पण माझ्या सारख्या टिपिकल मध्यमवर्गात वाढलेल्या मुलाला चहा सोबत फारफार बिस्किटं इतकंच माहित आणि ती देखील पारले ग्लुकोज किंवा मारी. (बुरबॉन वगैरे म्हणजे तर चैनच ….). पण मोठ्या लोकांकडचा हा High Tea नामक प्रकार मात्र माझ्यासाठी अगदीच नवीन होता.
मग काय तो नयनरम्य High Tea आणि interview पुढचा दीड-एक तासात संपला आणि पुढल्या अर्ध्या पाऊण तासात मी माझं शूट संपवलं. त्या दोघांमध्ये शशीजी खूपच मीत भाषी होते पण शम्मीजी मात्र तितकेच उत्साही. त्यांनी मला आवर्जून त्यांच्या जवळचा मॅकॅनडॉश म्हणजे सध्याच्या apple कंपनीचा i mac दाखवला होता आणि त्याच्या सोबत एक फोटोही काढून घेतला. शम्मीजी खूप Tech Savvy होते. त्या आधी मी कॉम्पुटर नामक नुसते चौकोनी डब्बेच बघितले असल्याने एखाद्या कँडी सारखा दिसणारा अँपल कंपनीच्या तो सुंदर आणि तितकाच नेटका असा कॉम्पुटर बघून मी तर पुरताच हरखून गेलो होतो.
झालं शूट संपवून आम्ही बाहेर पडलो आणि आता ही गोष्ट कधी एकदा सगळ्यांना सांगतो असं मला झालं होतं. गम्मत म्हणजे ह्या दोघांबरोबर शूट करणार आहे ही गोष्ट मी मुद्दामच कोणालाही म्हणजे अगदी घरी आई बाबांनाही सांगितली नव्हती.
शूट संपवून घरी परतत असतांना ट्रेन मधे बाजूलाच बसलेल्या एका माणसाने माझ्या एकंदरीतच केस वाढलेल्या आणि सोबत अंगात चढवलेल्या चित्रविचित्र कपड्यांकडे बघत मला कुतूहलाने विचारलं, “Are you an artist”?
एकतर त्यादिवशी मी already हवेत होतो त्यात त्या माणसाचा तो प्रश्न ऐकला आणि नाक अजून थोडं वर करत आणि ओसंडून चाललेल्या उत्साहात म्हटलं “हो! I am a Press फोटोग्राफर आणि आत्ता मी नुकताच शम्मी कपूर आणि शशी कपूर ह्यांच्या बरोबर शूट करून आलोय.
मनात दाबून धरलेली ही वाक्य तोंडाचा दरवाजा फोडून कधी बाहेर आली ते माझं मलाच कळलं नाही….. आता मला प्रश्न विचारणाऱ्या त्या माणसा बरोबरच गाडीतली अजून एक दोन माणसं पण माझ्याकडे बघत होती….

– ४ –
जेव्हा मी दुसऱ्यांदा देवाघरी जातो !

 असं म्हणतात की मेल्या नंतरच स्वर्ग दिसतो आणि आपली स्वर्गाची कल्पना काय तर साधारण जिथे देव राहतात ती जागा. त्यामुळे ह्याच स्वर्गाच्या कल्पनेला अनुसरून असा स्वर्गवास अनुभवायचा चान्स मला आयुष्यात एकदा सोडून दोनदा मिळाला होता आणि तोही जिवंत पणीच. देवाला भेटल्यावर कुणालाही आनंदच होईल आणि मी तर चक्क ‘देव आनंद‘ नां भेटलो होतो तेही एकदा नाही तर चक्क दोनदा.
हे आत्ता मी जितक्या सहजपणे लिहिलंय तितक्याच सहज पणे मला Gentleman Magazine च्या (त्याच त्या) एडिटरिण बाईने सांगितलं होतं, की “उद्या देव आनंद साहेबांना शूट करायचंय”. वर सांगितल्या प्रमाणे गाठीशी अनुभव असा मुळीच नव्हता पण confidence विचाराल तर तो मात्र जग जिंकायला निघालेल्या सिकंदर इतका…
सेलिब्रिटी स्टार बरोबर शूट करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या क्राफ्ट मध्येच निपुण असून चालत नाही तर वागण्या बोलण्याची रीत ही तुम्हाला तितकीच कळायला हवी. हे किंवा असे बरेच धडे शाळा कॉलेजात कधीच शिकवले जात नाहीत पण तुमचं professionच तुम्हाला ते शिकवत असतं.
एखाद्या मोठ्या व्यक्ती बद्दल वाटणारी आदरयुक्त भीती ही कधीही योग्यच पण एखाद्याला विनाकारण घाबरून काहीच नं बोलणं हे देखील बरोबर नाही. माझ्या साठी तर सगळंच नवीन त्यामुळे ज्यावेळेला आमच्या त्या पारशी एडिटरीण बाईंनी मला कॅबिन मधे बोलावून ही गोष्ट सांगितली त्या वेळी मी तर जवळ जवळ हवेतच उडालो होतो.
अरे देव आनंद, मग तो जरी ६० वर्षांचा झालेला असला तरीही तो शेवटी ‘The देव आनंद’ होता. ज्याचे सिनेमे मी आज इतक्या वर्षांनंतर देखील तितक्याच आत्मीयतेने बघतो तो देव आनंद, फिफ्टीज सिक्सटीज मध्ये एक चॉकलेट हिरो म्हणून जो ओळखला जात असे तो देव आनंद. तो जितका मोहोम्मद रफींच्या अजरामर गाण्यांमुळे लक्षात राहिला आहे तितकाच त्याच्या देव आनंद style च्या चालण्या आणि बोलण्याने पण. त्यामुळे देव साहेबांना शूट करायला मिळणं ही गोष्ट माझ्या साठी तर आभाळ ठेंगणं करणारीच होती.
थोड्या वेळाने पुन्हा जमिनीवर आल्यावर मी शूट कसं करायचं ह्याचा विचार करायला लागलो. तो जमाना पेजरचा होता, मदतीला Internet काका Google भाऊ कोणीही नसायचं आत्ताच्या काळात असतो तर मी लगेच reference shots चं एक dossier बनवून त्यांच्या स्टयलिस्ट बरोबर discuss करून त्यांचं look ठरवलं असतं. पण तेव्हा तसलं काहीही नव्हतं त्यामुळे डायरेक्ट शूट च्याच दिवशी मी २ Lights आणि Camera घेऊन माझ्या एडिटर बाईं सोबत थेट देव साहेबांच्या पाली हिलच्या ऑफिस वर जाऊन धडकलो. देव साहेब वेळेचे एकदम पक्के होते त्यामुळे तिथे वेळेच्या बरोब्बर १५ मिनिटं आधीच म्हणजे १० वाजून ४५ मिनिटांनी आम्ही पोहोचलो. बरोब्बर १०.५५ ला देव साहेब हजर झाले. त्यांच्या कॅबिन मधे मग ज्या सोफ्यावर बसून ते interview देणार होते त्याच्या बाजूलाच मी lights arrange केले, मिटरने Light reading वगैरे घेतलं आणि कॅमेरात रोल भरून त्यांचे फोटो घ्यायला सज्ज झालो. Interview चालू झाला…. मी जमेल त्या अँगल ने फोटो काढायला सुरवात केली. interview चालू असताना फोटो काढायची माझी ही पहिलीच वेळ असल्याने ‘सर जरा कॅमेरात बघा, सर जरा smile करा असल्या instructions मी त्यांना देऊ शकत नव्हतो किंवा interview चालू असतांना मी तश्या सूचना त्यांना देणं हे कितपत योग्य असतं हे देखील मला नीटसं माहित नव्हतं.
बरं आमच्या एडिटरीण बाई फार काय friendly कॅटेगरीतल्या नसल्याने त्यांना असल्या शंका येता येता टॅक्सित विचारण्याची पण सोय नव्हती. असो तर तासाभरात interview संपला आणि देव साहेब उठून आपल्या कामाला निघून गेले. मी जेमतेम पाऊण रोल शूट केला होता. मला वाटलं होतं की interview संपल्यावर मला शूट साठी अजून पंधरा वीस मिनिट तरी मिळतील पण कसलं काय मला pack up करावं लागलं. मला कळत होतं मला फार काही मिळालेलं नाहीये.
मी ऑफिसला गेल्या गेल्या रोल develop करायला दिला. तासा-दिड तासात results हातात आले आणि मला वाटलं होतं तसंच झालं….फोटोज बऱ्या पेक्षाही खालच्या लेव्हलचे होते. portrait काढतांना one to one communication खूप गरजेचं असतं पण हे असलं privilege मला कुठून मिळणार होतं. मी क्षणभरा करता एकदम nervous झालो पण मग लगेच मी ठरवलं की नाही असं करून चालणार नाही, एडिटर बाईंना काय ते खरं सांगून सरळ सरळ देव साहेबांना पुन्हा वेळ देण्याची विनंती करावी. मला माहित होतं की मला आता एडिटर बाई कडून सॉल्लिड पडणार आहे पण तरीही I decided to take it. मला वाटल्या प्रमाणे एडिटर बाई मला बोल बोल बोलल्या आणि शेवटी माझ्या नशिबाने एकदाचा मला देव साहेबांच्या त्या सेक्रेटरीचा नंबर दिला. आणि जाता जाता तू तुझ्या जबाबदारीवर फोन कर आणि निस्तर अशी ताकीदही दिली.
झालं दुसऱ्या दिवशी अकरा वाजता ठरल्या प्रमाणे मी त्यांच्या ऑफिसला त्यांच्या सेक्रेटरीकडे फोन लावला आणि झाला प्रकार त्यांच्या तिला सांगितला पुढे जाऊन अजून अगदी निर्लज्जपणे तिला देव साहेबांकडे शब्द टाकण्याचीही विनंती केली. विचारून सांगते म्हणत तिने माझा फोन होल्ड वर ठेवला आणि २० एक सेकंद झाली असतील आणि माझा माझ्या कानांवर विश्वास बसंत नव्हता कारण समोरून खुद्द देवसाहेबच माझ्याशी बोलत होते. अचानक आलेल्या ह्या प्रसंगाने माझी तर फुल टू तारांबळच उडाली. त्या अवस्थेत मी मधेच हिंदी मधेच इंग्लिश अशा थाटात …. Sir interview चालू था इसलिये…. सर मै…..I mean sir….. I couldn’t वगैरे वगैरे असं ….सर – सर करत माझं म्हणणं कसं बसं त्यांना सांगितलं आणि ती वेळ निभावून नेली.
माझी ती नम्र किंवा कळकळीची विनंती बहुतेक त्यांच्या पर्यंत पोहोचली असावी…….फार काही आढे-वेढे नं घेता त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी अकरा वाजताची appointment दिली. हुश्श्श! मला दरदरून घाम फुटला होता आता माझ्या नशिबानेच चालून आलेल्या ह्या दुसऱ्या संधीचं सोनं करण्या व्यतिरिक्त माझ्याकडे पर्यायच नव्हता. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी त्यांच्याकडे पोहोचून मी केलेल्या plan प्रमाणे त्यांचे फोटो घेतले. ह्यावेळी मात्र मी चांगले एक दोन रोल शूट केले.
हुश्श्य !!! एकदाचं ते दिव्य पार पडलं. मी तात्काळ रोल्स प्रोसेस केले. Results त्या वेळच्या मानाने ठीकठाकच आले होते. पण आज जेव्हा ह्या गोष्टीचा मी विचार करतो तेव्हा जाणवतं, की आयुष्यात असा दुसरा चान्स फक्त “देवंच” देऊ शकतो ?


शूट संपल्यावर मी देव साहेबांना Autograph बद्दल विनंती केली. Sure! म्हणत त्यांनी मी दिलेल्या वहीत ऑटोग्राफ दिली
आणि आधीच्या पानांवरच्या शम्मी कपूर आणि शशी कपूर ह्यांच्या सह्या नीट याहाळत मला वही परत केली आणि
माझ्याकडे हसत हसत बघून डोळे मिचकावले…… डिट्टो देव आनंद सारखे…. 😊

– ५ –
फिल्मफेअर मधे माझा ‘बेबी’ प्रवेश…. !

Gentleman मॅगझिन च्या अवघ्या ३ महिन्यांच्या माझ्या वास्तव्यात मी शम्मी कपूर, शशी कपूर आणि चक्क देव साहेबां सारख्या स्टार लोकांना जवळून बघितलं आणि त्यांचं फोटो सेशन देखील केलं. आनंदाची एवढी एकंच गोष्ट सोडली तर एक फोटोग्राफर म्हणून माझ्या हाताला काहीही लागलं नव्हतं. लौकीकार्थाने Gentleman मधल्या दुसऱ्या घवघवीत अपयशा नंतर पुन्हा मी संधीच्या शोधात असतांनाच पुढच्या १-२ महिन्यांतच मला चक्क टाइम्स ऑफ इंडिया मधून पुन्हा इन हाऊस फोटोग्राफरचीच ऑफर आली.
म्हणजे त्याचं झालं असं झालं की मी अगदी नेहमीच्या रुटीन प्रमाणे माझा पोर्टफोलिओ घेऊन फेमिना मॅगझिनच्या त्या वेळच्या एडिटर मिसेस. सत्या सरन ह्यांना भेटायला गेलो होतो. सहज म्हणून मी खडा टाकून बघितला की जर का तुम्हाला in-house फोटोग्राफर ची आवश्यकता असेल तर मला काम करायला आवडेल. मी सहज म्हणून विचारलेली गोष्ट त्यांनी खूपच सिरिअसली घेतली आणि पुढच्या महिन्या भरातच अजून काही interviews चे सोपस्कार पूर्ण करून मी चक्क टाइम्स ग्रुपच्या फेमिना मॅगझिनमधे त्यांचा official फोटोग्राफर म्हणून appoint झालो .
वयाच्या जेमतेम चोविशीत टाइम्स सारख्या इतक्या मोठ्या संस्थे मधे काम करायला मिळणं ही माझ्यासाठी तर फारच आनंदाची आणि तितकीच अभिमानाची गोष्ट होती. इतक्या मोठ्या संस्थे साठी काम करायची माझी पहिलीच वेळ त्यात टाइम्स चा फोटोग्राफर ह्या हुद्यालाही एक वलय असल्याने मी तर बरेच दिवस हवेतंच होतो.
मोठे पणा म्हणून नाही तर गम्मत म्हणून टाइम्स मधला एक किस्सा सांगतो. मला पहिल्याच दिवशी त्या वर्षीची फेमिना मिस इंडिया एशिया पॅसिफिक मिस.मनप्रित ब्रार हीच्या फोटो शूट साठी पाठवलं. मला जॉईन होऊन फक्त एक दिवस झालेला आणि join झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बॉम्बे टाइम्सच्या फ्रंट पेज वर मी काढलेला मनप्रितचा तो फोटो माझ्या नावा सकट छापून आला. फोटो ठिकठाकच होता पण शेवटी तो Bombay Times च्या फ्रंट पेजवर छापून आला होता. अर्थात तो बघून मला आनंदच झाला पण गंमत अशी झाली की त्याच दिवशी दुपारी बॉम्बे टाइम्स चे एक अतिशय सिनियर फोटोग्राफर मला आमच्या कॅन्टीनच्या लिफ्ट पाशी भेटले आणि स्वतःहून माझी ओळख करून घेत माझ्या छापून आलेल्या त्या फोटोचं तोंडभरून कौतुक करत मला म्हणाले की,”राजेश, मुझे भी तुम्हारे जैसी commercial फोटोग्राफी सिखनी है”। बापरे! त्यांच्या ह्या वाक्याने मी तर फार म्हणजे फारच ओशाळलो कारण एक तर मी बिगिनर होतो आणि त्यात त्या फोटो मधे खरं सांगायचं तर विशेष असं काहीच नव्हतं. अगदी प्रामाणिक पणे सांगतो की १००टक्के ही सर्व करामत माझ्यावरच्या सर जे. जे. कॉलेजच्या शिक्क्याचीच होती. जे जे कॉलेजचा हा काऱीस्मा पुढे माझ्या कॅरियर मध्ये मला बऱ्याचदा अनुभवायला मिळाला.
नंतर बरेच दिवसांनी मला कळलं की त्याकाळी टाइम्स ग्रुप मधे फोटोग्राफर म्हणून एन्ट्री मिळणं ही किती कठीण गोष्ट होती ते. आणि त्यामुळेच असेल कदाचित टाइम्स साठी काम करणाऱ्या त्यावेळच्या बऱ्याचश्या फोटोग्राफेर्स ना हा प्रश्न नक्कीच पडला असणार की ह्या कालच्या पोराला इतक्या सहज पणे टाइम्स मधे कशी काय एन्ट्री मिळू शकली.
असो! जरी मी फेमिना मॅगझीन साठी नेमलेला असलो तरीही टाइम्स ग्रुप च्या कुठल्याही पब्लिकेशनचं काम करायला मी बांधील असणार होतो. सुरवातीचे चारपाच महिने माझं काम फक्त फेमिना साठीच चालू होतं. Filmfare ह्या सिने मॅगझिनचं ऑफिस फेमिनाच्या आमच्या ऑफिसला लागूनच असल्याने तिथल्या स्टाफ बरोबर माझी हळू हळू ओळख वाढत होती. त्या वेळचे Filmfare चे एडिटर श्री. खालिद मोहोम्मद ह्यांनी माझं फेमिना मध्ये छापून आलेलं काम बघून एके दिवशी मला चक्क फिल्म फेअर साठी एका assignment ची ऑफर केली. ती ऑफर होती प्रख्यात फिमेल कॉमेडियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, जुन्या काळातलय अभिनेत्री बेबी टुणटुण ह्यांच्या बरोबर फोटो सेशन करण्याची. त्यांच्या ह्या ऑफर मुळे मला साहजिकच खूप आनंद झाला पण त्याआधी पहिल्यांदा मला आमच्या एडिटर सत्या मॅडमची परवानगी घेणं किंवा त्यांना inform करणं आवश्यक होतं. आणि पहिल्या काही महिन्यात फेमिना मधला माझा परफॉर्मन्स चांगला असल्याने फार काही आढेवेढे नं घेता त्यांनी मला Filmfare च्या त्या assignment साठी लगेच होकार दिला.

 

वयाच्या सत्तरीत देखील बेबी टुणटुण ह्यांच्या मधलं लहान मूल अगदी टुणटुणीत होतं.

 बेबी टुणटुण ह्यांना लहान असतांना मी बऱ्याच चित्रपटांमध्ये कॉमेडियन च्या रोल मधे बघितलं होतं पण त्या एक प्लेबॅक सिंगर म्हणून देखील प्रसिद्ध होत्या ही गोष्ट मात्र त्यांना भेटल्यावर मला कळली.
बेबी टुणटुण ह्यांचा interview आधीच झालेला असल्याने मला त्यांच्या घरी जाऊन त्यांचे फक्त काही फोटोज घ्यायचे होते. मला आता स्पष्ट आठवत नाहीये पण वांद्राला का कुठल्यातरी वेस्टर्न सबर्ब मधे त्यांच्या घरीच मी त्यांचं फोटो सेशन केलं होतं. आता इतकंच आठवतंय की त्या वेळी साधारण सत्तरीत असलेल्या बेबी टुणटुण ह्यांनी खूप मिश्किल पणे कॅमेरा face केला होता. बेबी टुणटुण ह्यांचे फोटोज एडिटर खालिद ह्यांना खूपच आवडले आणि अशा पद्धतीने Filmfare ह्या सिने मॅगझिन मधे माझा Baby प्रवेश झाला.

 

-६-
दादा मुनी, ट्रिपल फाय आणि किशोर दा !

आजही आठवलं तरी कधी कधी अजून विश्वास बसत नाही की मी टाइम्स मधल्या त्या निव्वळ दोन वर्षांच्या प्रवासात कितीतरी अशा सेलिब्रिटीज ना भेटलो ज्यांना पहात पहात मी मोठा झालो होतो. त्यातले काही तर आजही माझे खूप आवडते कलाकार आहेत. त्या सर्वांमधे माझ्या लक्षात राहिले होते ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आणि हिंदी फिल्म इंडस्ट्री मधले पितामह म्हणून ओळखले जाणारे दादा मुनी अर्थातच श्री.अशोक कुमारजी. मी ज्या वयात त्यांचे चित्रपट बघितले होते त्यावेळी ते ऑलरेडी वडीलधाऱ्या रोल्स मध्ये आले होते पण १९३६ सालात जीवन नैय्या ह्या चित्रपटा पासून करियर ची सुरवात केलेल्या रुपेरी पडद्यावरच्या ह्या इतक्या सिनिअर कलाकाराचा अभिनय हा तितकाच contemparary होता. कुठल्याही भूमिकेतील त्यांचा वावर हा इतका जिवंत असे की ही व्यक्ती अभिनय करत नसून आपल्या समोर खरोखरीच वावरते आहे की काय असंच वाटे. मग तो ज्वेल थिफ मधला त्यांचा निगेटिव्ह रोल असो की शौकीन मधला रंगेल म्हातारा किंवा अगदी त्यावेळी त्यांची गाजलेली पान पराग ची TV ऍड असो…. प्रत्येक वेळी ह्या माणसाने पडद्यावर निव्वळ चैतन्यच उभं केलं.
अशोक कुमारजींना मला भेटायचा आणि त्यांचे फोटो काढायचा योग आला ते १९९६ मधे त्यांना मिळालेल्या फिल्म फेअरच्या Life time achievment award मुळे. निव्वळ शारीरिक वयामुळे दादामुनी त्या वर्षीच्या फिल्म फेअर सोहळ्याला हजर राहू शकले नव्हते त्या मुळे तो पुरस्कार त्यांना त्यांच्या घरी जाऊन बहाल करण्यात आला होता. मला आता फक्त त्यांच्या घरी जाऊन त्या ट्रॉफी सोबत यांचे काही फोटोज घ्यायचे होते.
मी सकाळचीच वेळ ठरवून चेंबूर मधल्या त्याच्या निवासस्थानी पोहोचलो. बंगल्याच्या आवारात शिरता शिरताच त्यांचे फोटो काढण्या साठी चांगला लाइट कुठे मिळेल अशी एक जागा मी आधीच हुडकून ठेवली होती.
मी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो तेव्हा अशोकजी पेपर वाचत drawing room मधेच बसले होते. अशोक कुमार हे चहा, सिगारेट आणि त्या बरोबरच्या गप्पांचे चे प्रचंड शौकीन होते त्यामुळे मी गेल्या गेल्या आधी त्यांनी मला चहा ऑफर केला आणि मला कंपनी म्हणून माझ्या बरोबर पुन्हा एकदा चहा घेतला. त्या नंतर आमच्या गप्पा इतक्या रंगात आल्या होत्या की मी कशासाठी आलोय तेच काही क्षण विसरून गेलो. पण मग त्यांना मला मधेच इंटरप्ट करावं लागलं आणि ‘लाइट जाईल’ ह्या सबबीवर मी त्यांना शूट साठी तयार केलं. अर्थात मला हवा तसा लाइट त्यांच्या घराच्या entrance च्या लॉबी मधेच येत असल्याने आमचे शूट अवघ्या अर्ध्या पाऊण तासातच संपले. फोटो सेशन इतक्या लौकर संपल्याच्या आनंदात पुन्हा आता चहा व्हायलाच हवा! आणि तसा तो झाला देखील पण ह्या वेळी मात्र ते चहा प्यायला मला थेट त्यांच्या बेडरूम मधे घेऊन गेले. चहा सोबत पुन्हा गप्पा चालू झाल्या. मी फिल्म फेअर चा official फोटोग्राफर असल्याने माझा भाव होताच त्यात अजून मी सर जे जे स्कूल चा स्टुडंट आहे हे कळल्यावर मग तर काय त्यांच्या लेखी माझा भाव अजूनच वधारला. बोलता बोलता त्यांनी त्यांच्या सवयी प्रमाणे 555 सिगरेटचं पाकीट काढलं आणि स्वतःघेण्या आधी ते माझ्या पुढे धरलं. मी ओशाळून नाही म्हंटलं तसं म्हणाले अरे आर्ट स्कूल मे जाकंर सिगरेट नही पिते हो? आणि पुढे मिश्किल पणे हसत म्हणले …. या कोई दुसरा ब्रँड पिते हो ?
म्हटलं,”नही सर ऐसी कोई बात नही है, बस आपके सामने हिम्मत नही हो रही है ।
मी असं बोलल्यावर त्यांच्या त्या टिपिकल हमलोग style मधे हसत स्वतः मस्त पैकी सिगरेट लाइट करून आणि मस्तपैकी सिगरेटचे झुरके घेत घेत पुन्हा माझ्या बरोबरच्या गप्पांचा कार्यक्रम चालू केला. आमचं गप्पाष्टक चालू असतांनाच माझं लक्ष सहज त्यांच्या बेडच्या बाजूलाच लावलेल्या आणि हार घातलेल्या एका फोटोकडे गेलं. नीट बघितली तेव्हा लक्षात आलं की ती फ्रेम साक्षात स्वर्गीय श्री. किशोर कुमार ह्यांची होती. मला अचानक जाणीव झाली की इतक्या वेळ मला एका मित्रा सारखं वागवत माझ्याशी बोलणारी ही व्यक्ती किती उत्तुंग आहे ते! आणि किशोर कुमारांबद्दल काय बोलायचं? त्यांच्या असंख्य गाण्यांनी आणि विनोदी ढंगाच्या त्यांच्या अभिनयाने आज पर्यंत इतकं दिलंय की जणू काही ही मंडळी म्हणजे देवाने आपल्याला दिलेल्या देणग्याच असाव्यात. ह्या लोकांनी आपल्याला फक्त आणि फक्त आनंदच दिला आहे. त्याची परत फेड कधीही होऊ शकत नाही.
त्या ओघातच मग किशोर कुमारांचा विषय चालू झाला. दादा मुनी आता किशोर कुमारांच्या आठवणीत हरवून गेले होते. माझ्या पुढ्यात एक गुरूतुल्य व्यक्ती दुसऱ्या एका तितक्याच असामान्य व्यक्ती बद्दल बोलत होती. मी फक्त त्या अविस्मरणीय क्षणांचा साक्षिदार होतो…
किशोर कुमारांचा फोटो ज्या क्षणी मी बघितला त्या वेळी खरंच सांगतो माझ्या अंगावर काटा आला होता म्हणजे मला त्या वेळी काय वाटलं होतं हे शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. हिमालया समोर उभं राहिल्यावर जसं आपल्याला आपल्या छोट्याश्या अस्तित्वाची जाणीव होते….. तसंच काहीसं…..

 

-७ –
‘ शेफ ‘ मनीषा कोईराला….

Just imagine….तुम्ही आणि तुमचे काही मित्र तुमच्या कुठल्यातरी एका मैत्रिणीच्या घरी पार्टी साठी गेला आहात आणि ती मैत्रीण नेमकी त्यावेळी कुठेतरी बाहेर गेली असल्याने तुम्ही सगळे तिच्या घरात तिचीच वाट बघत बसले आहात आणि जवळ पास एक ते दीड तास वाट बघितल्यावर अचानक ती मैत्रीण एक भला मोट्ठा टिफिन हातात घेऊन घरात येते आणि तुम्ही काही विचारण्या किंवा बोलण्या अगोदरच म्हणते की “अगं किंवा अरे, आज तुम्ही घरी येणार म्ह्णून काही तरी खास बनविन म्हटलं आणि सकाळी उठून बघते तर काय सग्गळा गॅस संपलेला” मग काय… सकाळी शेवटी सगळा स्वयंपाक अमुक अमुक त्या एका मैत्रिणीच्या घरी जाऊन आटपला. सक्काळी १० वाजल्या पासून जी गेले होते ती (भिंतीवरच्या घड्याळात दुपारचे ३ वाजलेले दाखवत) आत्ता येते आहे बघ”! “बसा हं मी आलेच”.
आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की गॅस संपणे आणि त्याच दिवशी नेमके पाहुणे येणार असल्याने एखाद्याची (म्हणजे घरातल्या गृहिणीचीच) तारांबळ उडणे ह्या गोष्टीचं इतकं काय कौतुक. ये तो हमारे जैसे मध्यमवर्गीय माणूस के आयुष्य मे नेहमीच घडता है।
बरोबर आहे पण मी वर सांगितलेल्या ह्या प्रसंगातली टिफिन घेऊन आलेली ती मुलगी म्हणजे साक्षात मनीषा कोईराला होती. मनिषा कोईराला म्हणजे खामोशी, दिल से, बॉम्बे, 1947 a love story, मन ह्या सारख्या अनेक blockbuster सिनेमांची हिरॉइन. आपल्या मादक सौन्दर्याने लाखो दिलों धडकन असलेली मनीषा कोईराला ही त्यात अजून नेपाळच्या पूर्व पंतप्रधानांची नातं! त्यामुळे मनीषा कोईराला हिला आपण एखाद्या सामान्य मुली सारखी कधी imagine करू शकूच शकत नाही ! ! !
पण मी चक्क ह्या अद्भुत प्रसंगाचा साक्षीदार होतो. त्या दिवशी मला सिनेमा थिएटर मधल्या त्या साध्या कापडी पडद्याला रुपेरी पडदा का म्हणतात ह्या गोष्टीचा पुसटसा अंदाज आला. कारण हा रुपेरी पडदा त्यावर झळकणाऱ्या आणि आपल्याला स्वप्नलोकात घेऊन जाणाऱ्या ह्या सर्व तारका मंडळीना मुळी देवत्वच प्राप्त करून देतो. खरं तर ती देखील आपल्या सारखीच हाडा-मासाचीच माणसं असतात पण आपण नेहमीच ह्या सर्व सिने तारकांना त्यांनी साकारल्या भूमिके सारखेच समजत असतो. म्हणजे हिरो हा चांगला सर्वगुणसंपन्न आणि व्हिलनचा रोल करणारा कलाकार म्हणजे वाईट वगैरे वगैरे.
असो! तर मी सांगितलेला हा प्रसंग प्रत्यक्ष मनिषा कोईरालाच्याच घरी आणि तो देखील माझ्या डोळ्यादेखत घडलेला होता. अर्थात त्या दिवशी तिच्या घरी येणाऱ्या त्या मित्रां मधला मी एक नक्कीच नव्हतो. तर ते मित्र होते साक्षात श्री. नाना पाटेकर आणि श्री. संजय लीला भन्साळी. मी तिच्या घरी फिल्मफेअर मॅगझिन चा एक official फोटोग्राफर म्हणून गेलो होतो आणि माझ्या बरोबर सध्याचा फिल्म फेअरचा एडिटर असलेल्या श्री. जितेश पिल्लाई होता. अर्थात जितेश हा पहिल्या पासूनच एक निष्णात सिने पत्रकार असल्याने त्याचे बऱ्याच स्टार मंडळींशी अगदी घरोब्याचे संबंध होते म्हणजे अजूनही आहेत. सौन्दर्यखळी मनीषा कोईराला ही त्याच खास दोस्तां पैकी एक असल्या मुळे मनिषाने आल्या आल्या जितेशला अगदी hug वगैरे केलं. आणि मी बाजूला उभं राहून हे दिव्य दृष्य बघत होतो. जितेश ने मग माझी मनिषा बरोबर ओळख करून दिली. Manisha, “meet Rajesh our photographer, he is here to shoot you with the trophy (Filmfare trophy)”.
मनिषा कोयराला हिला त्या वर्षीच रिलिज झालेल्या, नानाची प्रमुख भूमिका असलेल्या आणि संजय लीला भन्साळी ह्यांनी डिरेक्ट केलेल्या खामोशी ह्या चित्रपटामधल्या भूमिके साठी Best Critics Award मिळालं होतं. पण काही कारणास्तव ती अवॉर्ड फंक्शन ला येऊ नं शकल्याने मला त्या दिवशी तिला शूट करायचा चान्स मिळाला होता.
पण त्यावेळी फोटो काढायचे आहेत म्हटल्यावर तिच्या चेहेऱ्यावरून तरी एकंदरीत तिचा शूट करायचा मूड दिसत नव्हता. एक तर इतके महत्वाचे पाहुणे घरात असतांना त्यात पुन्हा फोटो सेशन वगैरे म्हणजे फारच झालं. पण मॅगझिनची deadline असल्याने अगदीच नाईलाजाने ती तिच्या तश्याच विस्कटलेल्या आणि मेकअप नसलेल्या अवस्थेत पोज द्यायला तयार झाली. त्यामुळे माझं ते ‘ The मनीषा कोईराला बरोबरचं ‘ ड्रीम शूट अक्षरशः १०-१२ मिनिटात संपलं. आईशप्पथ सांगतो पण ती त्या वेळच्या तिच्या त्या natural look मधे सुद्धा गॉजस दिसत होती.
आम्ही म्हणजे जितेश आणि मी जेव्हा मनिषाच्या घरी पोहोचलो होतो तेव्हा ती कुठे तरी बाहेर गेली आहे इतकंच कळलं. पोहोचलो तेव्हा तिथे ऑलरेडी त्या दिवशीचे खास मेहमान दस्तुर खुद्द श्री. नाना साहेब पाटेकर आणि श्री. एस. एल. भन्साळी साहेब तिची वाट बघत ‘बसले’ होते. नानाने त्या दिवशी इंडियन क्रिकेट टीम one day दरम्यान परिधान करंत असत तो निळा T-Shirt परिधान केला होता. तिथे त्यांच्या सोबत ऑलरेडी असलेल्या एका जर्नलिस्टने नानाला त्या T-Shirt बद्दल विचारलं असता अगदी सहज पणे नाना म्हणाला, “अरे ये अझर ने मुझे गिफ्ट दिया है। अझर म्हणजे त्यावेळचा आपल्या क्रिकेट टीमचा कॅप्टन ‘मोहम्मद अझर उद्दीन‘.
असो! तर माझ्या साठी हे सर्व जगंच नवीन असल्यामुळे मी आ वासून ह्या सर्व गोष्टीं फक्त ऐकत आणि बघत होतो. लहान पणी एका Drawing कॉम्पिटिशन मधे मी चक्क नानाच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच बक्षिस घेतलं होतं, मला जसा त्याच्याशी बोलायचा चान्स मिळाला तसा तो प्रसंग मी मुद्दामूनच त्याला सांगितला. त्यात पुन्हा मी जे जे कॉलेजचा आहे हे कळल्यावर मग तर काय नाना साहेब अजूनच खुश झाले. नाना आमच्या कॉलेजचाच असल्याने जे जे कॉलेज हा नानाचा अतिशय आपुलकीचा विषय. मी फोर्थ इयरला असतांना एकदा नाना आमच्या ANNUAL EXHIBITION चा चीफ गेस्ट म्हणून आला होता. तेव्हा देखील तो कॉलेजच्या आवारात शिरल्या शिरल्या आमच्या डीनला भेटण्या ऐवजी आधी चक्क आमच्या कॅन्टीनच्या मालकाला म्हणजे रमेश शेटला जाऊन अगदी कडकडून भेटला. Applied Art च्या आमच्या त्या कॅन्टीन चा मालक रमेश शेट हा देखील एक अवलियाच होता. मला अजूनही आठवतंय की सर्व जण नानाला बघायला त्याच्या मागोमाग कॅन्टीन मध्ये शिरले होते. मी देखील त्या गर्दीतून वाट काढत जेव्हा कॅन्टीनच्या दारातून आत डोकाऊन बघितलं तेव्हा नाना चक्क खाली जमिनीवर बसला होता आणि रमेश शेट नानाच्या खांद्यावर डोकं ठेऊन घळा घळा रडत होता. नानाच्या डोळ्यात देखील त्यावेळी अश्रू दाटले होते. अर्थातंच ते गतकाळाच्या आठवांनींनी दाटून आलेले आनंदाश्रू होते.
असो! तर ह्या सर्व मंडळींच्या गप्पा चाललेल्या असतांना आणि आम्ही सर्वच जण मनीषा ताईंची वाट बघत असतांना दारावरची बेल वाजली आणि अखेर मनीषा ताईंचं आगमन झालं. तिच्या मागोमाग तिचा एक नोकर हातात ऍल्युमिनिअमचा एक भलामोठा टिफिन घेऊन आत शिरला. आत आल्याआल्या आधी सर्वांची माफी मागत मनीषा ताईंनी संपलेल्या गॅसची दर्द भरी कहाणी सगळ्यांना सांगितली. त्यातून कळलं की मनिषा कोईरालाने स्वतः सकाळ पासून राबून त्या दिवशीच्या पाहुण्यांसाठी खास नेपाळी पद्धतीचं जेवण बनवलं होतं.
मग काय सगळ्यां बरोबर मग तीच हाय, हॅलो hug वगैरे झालं………….
आणि मग …… मग काय ??? rest all is a history as you already know…..😉

 

मनीषा कोईराला आणि मुंबईतले प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ. श्री. गोयल एका प्रायव्हेट अवॉर्ड फंक्शन मधे.

 Beautiful मनीषा…

मनिषा कोईराला चे वरील सर्व फोटो मी त्या नंतर झालेल्या दुसऱ्या एका अवॉर्ड फंक्शन दरम्यान काढलेले आहेत. फिल्मफेअर च्या शूट चे फोटोज लवकरच update होतील.

– ८ –
मी एक उपग्रह!

ताऱ्यांभोवती जसे उपग्रह फिरतात तसंच सेलेब्रिटी फोटोग्राफेर्सचं असतं. ते पण असेच सतत कुठल्या ना कुठल्या ताऱ्याभोवती फिरत असतात. आता आठवलं की वाटतं माझ्या करियरच्या सुरवातीच्या काळात मी देखील अशी ही उपग्रहगिरी खूप केली होती. त्यातलीच लक्षात राहिलेली ही काही भ्रमणे.
फिल्म फेअर बरोबरची माझी शूट्स आता अगदी रेग्युलरली चालू झाली होती. एकंदरीतच खालिद सर कामावर खुश होते त्यामुळे फिल्म फेअरची महिन्यातून १-२ शूट्स तरी असत. बेबी टुणटुण पासून सुरु झालेला हा सिल सिला मला त्या वेळच्या बऱ्याच सेलेब्स कडे घेऊन गेला होता. त्यामुळेच मला जावेद जाफरी, प्रसिद्ध अभिनेते अमजद खान ह्यांचा चा मुलगा शादाब खान, बॅंडिट क्वीन मधला हिरो निर्मल पांडे, रोजा फिल्म चे DOP संतोष सिवन, Tollywood चा म्हणजे तामिळी फिल्म इंडस्ट्रीचा सुपर स्टार चिरंजीवी, माला सिन्हा, शबाना आझमी, ओम पुरी, अमोल पालेकर, शत्रुघ्न सिन्हा, मेहेमूद, प्रेम चोपडा, मलायका अरोरा अश्या अनेक दिग्गजां बरोबर फोटो शूट करण्याचा योग आला होता. ह्या सर्वां मध्ये काही शूट्स मात्र विशेष लक्षात राहिली ती मुख्यतः शूट दरम्यान घडलेल्या काही मजेशीर प्रसंगांमुळे. जसं अमोल पालेकर आणि त्यांची बायको चित्रा पालेकर ह्यांना शूट करण्यासाठी मी जे त्यांच्या घरी सकाळी फक्त २ तासा करिता म्हणून शिरलो होतो ते थेट संध्याकाळचा चहा घेऊनच बाहेर पडलो होतो म्हणजे गप्पा इतक्या रंगल्या होत्या की दोनाचे चे पाच तास कसे झाले ते कळलंच नाही.(त्यांच्या घरी त्या दिवशी माझ्या बरोबर माझा मित्र आणि सध्या बॉलिवूड मधला नावाजलेला सिनेमॅटोग्राफर महेश लिमये पण आला होता). माझ्या आठवणी प्रमाणे माझ्या करियर मधलं इतकं हसंत खेळत झालेलं हे एकमेव शूट असेल.
त्या नंतर अमजद खान ह्यांचा मुलगा शादाब खान ला त्याच्या डेब्यू फिल्म च्या संदर्भात त्यांच्या घरीच शूट करायला गेलो होतो. आणि त्या दिवशी नेमकं त्याच्या फिल्मचं शूट लांबल्या मुळे शादाबला घरी पोहोचायला खूप उशीर झाला आणि मला चांगली दीड-दोन तास तरी त्याची वाट बघायला लागली होती. मला अजूनही आठवत आहे की आल्या आल्या आधी त्याने माझी रीतसर माफी मागितली आणि अगदी अजीजीने मला विचारलंन, “राजेशजी क्या मै पहले थॊडा खा सकता हुँ? क्यूकी सेट पे बिलकुल टाइम नहीं मिला। चायला! आता दस्तुरखुद्द अमजद खान ह्यांच्या मुलाला मी कोण नाही म्हणणार? पण मला त्याच्या नम्र पणाचं, आणि मॅनर्सचं मनापासून कौतुक वाटलं. मला अजूनही आठवतंय त्याने मला अगदी आग्रहाने त्याच्या बरोबर जेवायलाही बसवलं होतं. आयुष्यात कधी वाटलंही नव्हतं की खुद्द गब्बर सिंग म्हणजे अमजद खान ह्यांच्या घरी त्यांच्या फॅमिली बरोबर मी असा कधी जेवण वगैरे घेईन म्हणून! गरम गरम फुलके आणि कुठली तरी सब्जी असं अगदी भरपेट लंच करून मगच आम्ही शूट साठी सुरवात केली होती. तसंच शत्रुघ्न सिन्हा आणि ओम पुरी ह्यांनी देखील अगदी रॉयल ट्रीटमेंट दिली होती. ओम पुरींबरोबर तर नंतरही मी बरेच दिवसां पर्यंत ह्या ना त्या कारणाने संपर्कात होतो…..

दी फिल्म इण्डस्ट्री मधील एक गब्बर कलाकार ‘श्री. अमजद खान’ ह्यांचा मुलगा ‘शादाब खान’ आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब.

डान्सर आणि कॉमेडियन जावेद जाफरी


Filmfare च्या शूट नंतर जावेद ने मला special request करून त्याच्या फॅमिली बरोबर एक exclusive शूट करून घेतलं

हिंदी फिल्म इंडस्ट्री मधील एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व श्री. ओम पुरी आपली पत्नी नंदिता पुरी समवेत. मी हे शूट फेमिना मॅगझिन च्या रोमान्स ह्या सदरा साठी केलं होतं. हा फोटो त्यांना इतका आवडला की त्यांनी त्यांच्या पर्सनल कॅलेक्शन साठी ह्या फोटोची एक प्रिंट फेमिना कडून खास मागवून घेतली होती. त्या निमित्ताने ह्या दिग्गज आणि तितक्याच down to earth माणसाला पुन्हा भेटण्याचा योग आला.

श्री. ओम पुरी ह्यांनी जितके सिरिअस रोल्स केले तितक्याच उत्स्फूर्त आणि सहजपणे त्यांनी कॉमेडी रोल्स देखील देखील साकार केले होते.

छय्या छय्या गर्ल आणि सुपर मॉडेल मलायका अरोरा आपल्या आई आणि बहीण अमृता अरोरा सोबत. हे शूट मी फेमिना साठी केलं होतं. ह्या शूट च्या काही प्रिंट्स तिने तिच्या पर्सनल कॅलेक्शन साठी फेमिना कडून आवर्जून घेतल्या होत्या.

Super model Malayka Arora with her mom and sister Amruta.

 प्रेम चोपडा ह्यांच्या घरी तर किस्साच झाला होता. Actually झालेलं असं की मी मिस.पुनिता चोपडा ह्यांना फेमिना मॅगझिनच्या कुठल्यातरी एका फिचर साठी शूट करायला गेलो होतो. त्यांच्या drawing रूम मधे माझा शूट चा सेटअप चालू असतांना मुख्य भिंती वरच्या एका शेल्फ मधे सहज लक्ष गेलं आणि लक्षात आलं की त्यातल्या बऱ्याचश्या फॅमिली फोटोजमधे श्री. प्रेम चोपडा ह्यांचे देखील फोटो आहेत. चौकशी केली तसं कळलं की श्री.प्रेम चोपडा हे पुनिता ह्यांचे वडील. आणि तेव्हा मला कळलं की मी चक्क बॉलीवूड मधल्या एका अतिशय सिनिअर अशा actor च्या घरात होतो ते. तो पर्यंत पाली हिल मधल्या त्या आलिशान पेन्ट हाऊस बाहेरच्या गलेलठ्ठ दरवाज्यावरची बेल दाबतांना मला कल्पनाही नव्हती मी चक्क प्रेम चोपडा ह्यांच्या घरची बेल दाबत होतो ते. मी पुनिता ह्यांना श्री. प्रेम चोपडांना भेटू शकतो का अशी विचारणा कम विनंती केल्यावर थोड्यावेळातच चक्क प्रेम चोपडा साहेब माझ्या पुढे अवतरले. डिट्टो पडद्यावरच्या प्रेम चोपडा सारखं अगदी प्रेमळ पणे हसत त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं. काय बोललो ते आता आठवत नाही पण त्यांचा तो गुबगुबीत शेक हॅन्ड अजूनही लक्षात आहे.
तसंच श्री.शत्रुघ्न सिन्हा ह्यांच्या घरी देखील खूप चांगला अनुभव आला होता. फेमिनाच्या रोमान्स ह्या सदरासाठीच मी श्री.शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा ह्यांचं फोटो सेशन त्यांच्या जुहू येथील रामायण ह्या निवासस्थानी केलं होतं. पूनम सिन्हा ह्या १९६८ मधल्या मिस इंडिया आहेत आणि शत्रुघ्न सिन्हा हे त्या वेळी नुकतेच काही चित्रपटात झळकले होते. त्यांचं लग्न कसं जमलं ह्या संदर्भातले मजेदार किस्से त्यांनी फेमिनाच्या रोमान्स ह्या सदरा मधे सांगितले होते. श्री.शत्रुघ्न सिन्हा बद्दल विशेष विशेष लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे त्यांचा पाहुणचार. त्याचं असं झालं होतं की नेहमीच मी अशा ह्या सेलेब्रिटी शूट्स साठी एकटाच जात असे. कितीही नाही म्हंटलं तरी फोटो शूट ला जातांना लाइट्स, स्टॅन्ड आणि इतर अशा अनेक छोट्या मोठ्या accessories चा फौजफाटा असतो. शूट चालू करण्या पूर्वी मी कुठल्याही assistant शिवाय लाइट्स वगैरे एकटाच सेट अप करतो आहे हे जेव्हा श्री. शत्रुघ्न ह्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी अगदी आवर्जून त्यांचा घरातल्या दोन नोकरांना आणि त्यांच्या ड्राइवरला माझ्या मदतीला पाठवलं. खरं सांगायचं तर त्यांचं हे gesture अगदी simple होतं पण माझ्या मते तो मला दिलेला respect होता. अजून एक आठवण म्हणजे शूट संपलं तेव्हा लहान असलेली सोनाक्षी नुकतीच शाळेतून आली होती. कराटे च्या ड्रेस मधे असलेल्या ८-९ वर्षांच्या सोनाक्षीचे पण मी त्यावेळी त्या दोघांबरोबर काही फोटो घेतले होते. बहुदा सोनाक्षी सिन्हा चं पहिलं छापिल शूट मीच केलं असेल… 😇😅😃
आणि आता जाता जाता थोडं मेहमूद साहेबांबद्दल. मेहमूद म्हटलं की पहिल्यांदा डोळ्या समोर येतो तो पडोसन मधला ओंगळ मद्रासी डान्स मास्टर. एक जमाना असा होता की मेहमूद साहेब मेन हिरो पेक्षा जास्त मानधन घेत कारण त्यांच्या नावावरच चित्रपट चालत असे. त्यांच्या फॅशनेबल लाइफ स्टाइल च्या कहाण्या देखील मी खूप ऐकलेल्या होत्या. ज्यावेळी मी मेहेमूद साहेबांच्या घरी गेलो होतो तेव्हा ते कुठल्यातरी आजारातून नुकतेच बरे होऊन भारतात आले होते. मला अजूनही आठवतंय मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या दोन्हीही नाकपुड्यां मधे ऑक्सिजनच्या नळ्या घातल्या होत्या आणि त्या अवस्थेत देखील हा माणूस बेड वर मस्त पैकी द्राक्ष मटकवंत बसला होता. मी गेल्यावर माझं अगदी दिलखुलासपणे स्वागत करत आणि मलाही द्राक्ष ऑफर करत एकेकाळी फिल्म इंडस्ट्री गाजवलेला हा हरहुन्नरी कलाकार मांडी ठोकून त्या अवस्थेतही माझ्याशी मस्त पैकी गप्पा मारत होता. खरंतर त्यांची ती अवस्था बघून मलाच कसंस होत होत पण ह्या माणसाचा मिष्कील पणा त्या अवस्थेतही टीकलेला बघून मी तर थक्कच झालो होतो.
असो तर फक्त दोन वर्षांच्या माझ्या ह्या उपग्रहगीरी मुळे मी बऱ्याच ताऱ्यांना भेटू शकलो. It was indeed a great fun and learning too… मुख्य म्हणजे माझ्यातला न्यूनगंड नावाचा राक्षस पाय लावून कधी पळाला ते माझं मलाच कळलं नाही.

 

– ९ –
खय्याम साहब को गुस्सा क्यू आता है ?

उपग्रहगिरीचा माझा हा उद्योग टाइम्स ला अलविदा करे पर्यंत अव्याहत पणे चालू होता. पण ह्या सर्वांमधलं मेमोरेबल आणि आणि माझ्या कायम लक्षात राहीलं होतं असं शूट म्हणजे म्युझिक डायरेक्टर श्री. खय्याम साहेबां बरोबरचं.
नेहमी प्रमाणे फिल्म फेअरचे एडिटर श्री. खालिद ह्यांनी मला म्युझिक डायरेक्टर खय्याम साहेबांच्या शूटचं ब्रिफींग दिलं. खय्याम साहेबांचा interview आधीच झालेला असल्याने मला जाऊन फक्त त्यांचे काही फोटोज घ्यायचे होते. ब्रिफींग झाल्यावर मी नेहमी प्रमाणे त्यांना फोन करून वेळ ठरवली. जुहूला त्यांचा घरीच आमची भेट ठरली होती.
खय्याम साहेबांचं नाव अर्थातच मी असंख्य वेळा रेडिओ वर ऐकलं होतं. तसंच त्यांची गाणीही मी अनेकदा ऐकली होती पण कुणी विचारलं असतं की सांग बघू त्यांनी संगीतबद्ध केलेलं एखादं गाणं तर ते मात्र मला पटकन सांगता आलं नसतं. ह्याला कारण म्हणजे पहिल्या पासूनच माझा शब्दांपेक्षाही सुरांकडेच जास्त ओढा आणि त्यामुळेच एखाद्या आवडत्या गाण्याचे सिंगर्स माझ्या पटकन लक्षात येत असंत आणि ते लक्षातही रहात असंत पण म्युसिक डायरेक्टर्सच्या नावांच्या बाबतीत मात्र माझी दांडी गुल व्हायची.
पण खय्याम साहेबांच्या कामा बद्दल माझी जिज्ञासा पुरवायला टाइम्स सारख्या कंपनी मध्ये अनेक लोकं होते त्यामुळे त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांबद्दल मला भरपुर माहिती आमच्या ऑफिस मधेच मिळाली. त्यांच्या कभी कभी, उमराव जान, बाझार, रझिया सुलतान ह्या सारख्या चित्रपटांची नावं ऐकून तर मला माझ्या अज्ञानाची कीव करावीशी वाटली. कारण वर नमूद केलेल्या चित्रपटली ही सर्वच गाणी मला आजही आवडतात. ती सर्वच timelessच आहेत.
असो! तर त्यांनी मला दुपारी दोन वाजताची अपॉइंटमेंट दिली होती आणि ठरल्या प्रमाणे वेळेच्या ५ मिनिटं आधीच मी त्यांच्या घरी पोहोचलो. दारावरची बेल दाबल्यावर खुद्द खय्याम साहेबांनीच दरवाजा उघडला. दारात मला एकटयालाच बघून बहुदा त्यांना आश्चर्य वाटलं असावं कारण मी आत शिरल्या शिरल्या त्यांनी मला पहिला सवाल केला,”बाकी के लोग कहाँ है? मी थोड़ा गोंधळलोच. पहिल्यांदा तर मला त्यांचा प्रश्नच कळला नाही. मी परत त्यांना विचारलं,” सर बाकी के लोग मतलब? त्यावर खय्याम साहेब थोड्या आश्चर्यानेच मला म्हणाले, “मतलब आपके लाइट वाले लोग कहाँ है ?”. असं विचारल्यावर मी अगदी सहज पणे म्हणून गेलो की,”सर मै तो daylight में ही शुट करने वाला हूँ। माझ्या ह्या उत्तराने मात्र ते माझ्यावर थेट भडकलेच. मला म्हणाले “तुम इतने बड़े मॅगज़ीन के फोटोग्राफर होते हुए भी बिना लाइट्स के शूट करने आगए”? मुझे अभी आपके एडिटर के साथ बात करनी है. असं म्हणत त्यांनी चक्क खालिद मुहोम्मद ह्यांना फोनच लावला.
बापरे ! माझ्या पोटात उगीचच गोळा. म्हणजे एखाद्या शूट साठी लाइट्स आणि कुठलाही ताफा नाही निव्वळ ह्या कारणासाठी कोणाला अपमानास्पद वाटू शकेल? असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्या आधी मी कित्येक सेलेब्सची शूट आवर्जून daylight मधेच केली होती. कारण बरेचदा natural लाइट मधे स्टुडिओ लाईट्स पेक्षाही चांगला result येतो. खरंतर ह्या सर्वच गोष्टी खूप subjective असतात. फोटोग्राफी मध्ये lighting किंवा composition ह्या गोष्टींसाठी कुठलेही ठराविक असे नियम नसतात. एखाद्या personality चा फोटो त्या व्यक्तीची स्टोरी visual फॉर्म मधे सांगण्यासाठी सक्षम असला की झालं मग तो daylight मधे शूट केला आहे की स्टुडिओ लाइट्स मधे ह्याने काहीच फरक पडत नाही.
बोलल्या प्रमाणे त्यांनी आमच्या एडिटर साहेबांकडे माझी जवळ जवळ शिकायतच केली. थोड्यावेळ त्या दोघांचं बोलणं झाल्यावर समोरून खालिद मोहम्मद ह्यांनी खय्याम साहेबांना मला फोन द्यायला सांगितला. खालिद सरांचा माझ्या वर विश्वास होता. खालिद सर समोरून अगदी शांत पणे मला म्हणाले, राजेश अगर वोह comfortable फील नहीं कर रहे हों तो वापिस आजाओ, लाइट्स वगैरा लेके बाद में वापिस चले जाना. मी हो म्हटलं आणि फोन ठेवला.
माझी शिकायत केल्यावर आता मात्र खय्याम साहेब थोडे निवळल्या सारखे वाटत होते. तेवढयात चहा आला आणि मग मी थोडं विषयांतर करायचं म्हणून चहा बरोबर मुद्दामच त्यांच्या कामाचा विषय काढला. त्यांच्या उमराव जान, कभी कभी, रझिया सुलतान ह्या चित्रपटांमधल्या मला आवडलेल्या सर्वच गाण्यांबद्दल त्यांच्याशी अगदी भरभरून बोललो. मस्का लावायचा म्ह्णून नाही तर ही सर्वच गाणी खरोखरीच माझी खूप फेव्हरेट होती आणि अजूनही आहेत. त्यांनी दिलेल्या संगीताचा माझा अभ्यास आणि इतकं प्रेम बघून आता मात्र खय्याम साहेब माझ्या वर कमालीचे खूष झाले होते. मी एकंदरीतच त्यांचा मूड बघून हळूच शूटचा विषय काढला. म्हटलं सर क्या हम Daylight मे आपके कुछ फोटोज try कर सकते है ? आणि त्यांना पुढे हे देखील सांगितलं की अगर ये फोटज आपको अच्छे नहीं लगे तो मै वापिस लाइट्स वगैरा लेके आ जाऊंगा! माझ्या ह्या विनंतीला मान देऊन खय्याम साहेब शूट साठी तयार झाले. मग त्यांच्याच बिल्डिंगच्या टेरेस वर आम्ही गेलो, टेरेस वरच्या पाण्याच्या टाकीच्या भिंतीवर सुकलेल्या शेवाळ्या मुळे खूप सुंदर असा एक पॅटर्न तयार झाला होता. सुकलेल्या शेवाळ्याच्या त्या textured बैकग्राउंड वरच मग मी खय्याम साहेबांचे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो click केले. झालं एकदाच ते शूट संपलं आणि एका अतिशय चांगल्या आणि happy नोट वर खय्याम साहेबांना मी अलविदा केला आणि तिथून बाहेर पडलो.
दुसऱ्या दिवशी शूट चे results आले. माझ्या मते तरी फोटोज डिसेंट आले होते. एडिटर खालिद सरांना देखील ते फोटोज खूप आवडले. मी आदल्या दिवशी झालेला सगळा प्रसंग त्यांच्या कानावर घातला आणि सुटकेचा निश्वास टाकंत त्यांच्या कॅबिन मधून बाहेर पडलो. त्या नंतर चार पाच दिवस झाले तरीही खय्याम साहेबांकडून पुन्हा काही बोलावणं आलं नाही ह्यातच मी खूष होतो…..
ग्रासहॉपर राजेश जोशी / जुलै २०२०