– ८ –

मी एक उपग्रह!

मला असं वाटतं ताऱ्यांभोवती जसे उपग्रह फिरतात तसंच सेलेब्रिटी फोटोग्राफेर्सचं असतं. ते पण तसेंच कुठल्या ना कुठल्या ताऱ्यांभोवती सतत फिरत असतात. आता आठवलं की वाटतं माझ्या करियरच्या सुरवातीच्या काळात मी देखील अशी ही उपग्रहगिरी खूप केली. त्यातलीच ही लक्षात राहिलेली काही भ्रमणे.
माझी फिल्म फेअर बरोबरची शूट्स आता अगदी रेग्युलरली चालू झाली होती. एकंदरीतच खालिद सर कामावर खुश होते त्यामुळे फिल्म फेअरची महिन्यातून १-२ शूट्स तरी नक्कीच असायची. बेबी टुणटुण पासून सुरु झालेला हा सिल सिला मला त्या वेळच्या बऱ्याच सेलेब्स कडे घेऊन गेला. आणि त्यामुळेच मला जावेद जाफरी, प्रसिद्ध अभिनेते अमजद खान ह्यांचा चा मुलगा शादाब खान, बॅंडिट क्वीन मधला हिरो निर्मल पांडे, रोजा फिल्म चे DOP संतोष सिवन, Tollywood चा म्हणजे तामिळी फिल्म इंडस्ट्री चा सुपर स्टार चिरंजीवी, माला सिन्हा, शबाना आझमी, ओम पुरी, अमोल पालेकर, शत्रुघ्न सिन्हा, मेहेमूद, प्रेम चोपडा, मलायका अरोरा अश्या अनेक दिग्गजां बरोबर फोटो शूट करण्याचा योग आला. ह्या सर्वां मध्ये काही शूट्स मात्र विशेष लक्षात राहिली ती मुख्यतः शूट दरम्यान घडलेल्या काही मजेशीर प्रसंगांमुळे जसं अमोल पालेकर आणि त्यांची बायको चित्रा पालेकर ह्यांना शूट करण्यासाठी मी जे फक्त २ तासा करिता म्हणून सकाळी त्यांच्या घरी शिरलो होतो ते थेट संध्याकाळचा चहा वगैरे घेऊनच बाहेर पडलो होतो म्हणजे गप्पा इतक्या रंगल्या होत्या की दोनाचे चे पाच तास कसे झाले ते कळलंच नाही. माझ्या आठवणी प्रमाणे माझ्या करियर मधलं इतकं हसत खेळत झालेलं हे एकमेव शूट असेल.
त्या नंतर अमजद खान ह्यांचा मुलगा शादाब खान ला त्याच्या डेब्यू फिल्म च्या संदर्भात त्यांच्या घरीच शूट करायला गेलो होतो. आणि त्या दिवशी नेमकं त्याचं ते फिल्म शूट लांबल्या मुळे शादाब ला घरी पोहोचायला खूप उशीर झाला आणि मला चांगली दीड-दोन तास त्याची वाट बघत बसायला लागली होती. मला अजूनही आठवत आहे की आल्या आल्या आधी त्याने माझी रीतसर माफी मागितली आणि अगदी अजीजीने मला विचारलंन, “राजेशजी क्या मै पहले थॊडा खा सकता हुँ? क्यूकी सेट पे बिलकुल टाइम नहीं मिला। चायला! आता दस्तुरखुद्द अमजद खान ह्यांच्या मुलाला मी कोण नाही म्हणणार? पण मला त्याच्या नम्र पणाचं, आणि मॅनर्सचं मनापासून कौतुक वाटलं. मला अजूनही आठवतंय त्याने मला अगदी आग्रहाने त्याच्या बरोबर जेवायलाही बसवलं. आयुष्यात कधी वाटलंही नव्हतं की खुद्द गब्बर सिंग ह्याच्या घरी त्यांच्या फॅमिली बरोबर मी असा कधी जेवण वगैरे घेईन म्हणून. गरम गरम फुलके आणि कुठली तरी सब्जी असं अगदी भरपेट लंच करून मगच आम्ही शूट ला सुरवात केली होती. तसंच शत्रुघ्न सिन्हा किंवा ओम पुरी ह्यांनी देखील अगदी रॉयल ट्रीटमेंट दिली होती. ओम पुरींबरोबर तर नंतरही मी बरेच दिवसां पर्यंत ह्या ना त्या कारणाने संपर्कात होतो…..

दी फिल्म इण्डस्ट्री मधील एक गब्बर कलाकार ‘श्री. अमजद खान’ ह्यांचा मुलगा ‘शादाब खान’ आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब.

डान्सर आणि कॉमेडियन जावेद जाफरी


Filmfare च्या शूट नंतर जावेद ने मला special request करून त्याच्या फॅमिली बरोबर एक exclusive शूट करून घेतलं

हिंदी फिल्म इंडस्ट्री मधील एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व श्री. ओम पुरी आपली पत्नी नंदिता पुरी समवेत. मी हे शूट फेमिना मॅगझिन च्या रोमान्स ह्या सदरा साठी केलं होतं. हा फोटो त्यांना इतका आवडला की त्यांनी त्यांच्या पर्सनल कॅलेक्शन साठी ह्या फोटोची एक प्रिंट फेमिना कडून खास मागवून घेतली होती. त्या निमित्ताने ह्या दिग्गज आणि तितक्याच down to earth माणसाला पुन्हा भेटण्याचा योग आला.

श्री. ओम पुरी ह्यांनी जितके सिरिअस रोल्स केले तितक्याच उत्स्फूर्त आणि सहजपणे त्यांनी कॉमेडी रोल्स देखील देखील साकार केले होते.

छय्या छय्या गर्ल आणि सुपर मॉडेल मलायका अरोरा आपल्या आई आणि बहीण अमृता अरोरा सोबत. हे शूट मी फेमिना साठी केलं होतं. ह्या शूट च्या काही प्रिंट्स तिने तिच्या पर्सनल कॅलेक्शन साठी फेमिना कडून आवर्जून घेतल्या होत्या.

Super model Malayka Arora with her mom and sister Amruta.

प्रेम चोपडा ह्यांच्या घरी तर किस्साच झाला होता. Actually मी त्यांच्या मुलीला I think पुनिता चोपडा ह्यांना फेमिना मॅगझिन च्या कुठल्यातरी एका फिचर साठी शूट करायला गेलो होतो. त्यांच्या drawing रूम मधे माझ्या शूट चा सेटअप चालू असतांना मुख्य भिंती वरच्या एका शेल्फ मधे सहज लक्ष गेलं. शेल्फ वर मांडलेल्या बऱ्याचश्या फॅमिली फोटोजच्या फ्रेम्स मधे प्रेम चोपडा ह्यांचे देखील फोटो होते. तो पर्यंत पाली हिल मधल्या त्या आलिशान पेन्ट हाऊस बाहेरच्या गलेलठ्ठ दरवाज्यावरची बेल दाबतांना मला कल्पनाच नव्हती मी चक्क bollywood मधल्या एका प्रख्यात actor च्या घरात प्रवेश करत आहे ते. तरीही मी एकदा खात्री करून घेतली तेव्हा कळलं की प्रेम चोपडा हे पुनिता ह्यांचे वडील. मी श्री. प्रेम चोपडांना भेटू शकतो का अशी विचारणा कम विनंती केल्यावर थोड्यावेळातच चक्क प्रेम चोपडा साहेब माझ्या पुढे अवतरले. डिट्टो पडद्यावरच्या प्रेम चोपडा सारखं अगदी प्रेमळ पणे हसत त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं. काय बोललो ते आता आठवत नाही पण त्यांचा तो गुबगुबीत शेक हॅन्ड अजूनही लक्षात आहे.
तसंच श्री. शत्रुघ्न सिन्हा ह्यांच्या घरी देखील खूप चांगला अनुभव आला होता. पुन्हा रोमान्स ह्या सदरासाठीच मी श्री शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी मिसेस. पूनम सिन्हा ह्यांचं फोटो सेशन मी त्यांच्या रामायण ह्या निवासस्थानीच केलं होतं. पूनम सिन्हा ह्या १९६८ मधल्या मिस इंडिया होत्या आणि शत्रुघ्न सिन्हा हे त्या वेळी नुकतेच काही चित्रपटात झळकले होते. त्यांचं लग्न कसं जमलं त्या संदर्भातले मजेदार किस्से रोमान्स ह्या सदरात छापले होते. श्री.शत्रुघ्न सिन्हा ह्यांच्या बद्दल विशेष सांगायचं म्हणजे ते खूप वक्तशीर आहेत तसंच माझा पाहुणचार देखील त्यांनी खूप सन्मान पूर्वक केला होता. मला मुद्दाम ही गोष्ट सांगावीशी वाटते कारण बहुतांशी वेळा मी अशा ह्या सेलेब्रिटी शूट्स साठी एकटाच जात असे. कितीही नाही म्हंटलं तरी फोटो शूट ला जातांना लाइट्स, स्टॅन्ड आणि इतर अनेक छोट्या मोठ्या accessories चा फौजफाटा खूप असतो. मी कुठल्याही assistant शिवाय लाइट्स वगैरे एकटाच हॅन्डल करतो आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी आवर्जून मला मदत करायला त्याच्या घरातल्या दोन नोकरांना आणि त्यांच्या ड्राइवरला पाठवलं. शूट संपलं तेव्हा लहान असलेली सोनाक्षी नुकतीच शाळेतून आली होती. मला अजूनही आठवतंय तेव्हा मी ८ -९ वर्षाच्या सोनाक्षीचे देखील त्या दोघांबरोबर काही फोटो घेतले होते. बहुदा सोनाक्षी सिन्हा चं पहिलं छापिल शूट मीच केलं असेल… 😇😅😃
आणि आता जाता जाता थोडं मेहमूद साहेबांबद्दल. मेहमूद म्हटलं की पहिल्यांदा डोळ्या समोर येतो तो पडोसन मधला ओंगळ मद्रासी डान्स मास्टर. एक जमाना असा होता की मेहमूद साहेब मेन हिरो पेक्षा जास्त मानधन घेत, त्यांच्या फॅशनेबल लाइफ स्टाइल च्या कहाण्या देखील मी खूप ऐकलेल्या होत्या. त्या वेळी मी जेव्हा मेहेमूद साहेबांच्या घरी गेलो होतो तेव्हा ते कुठल्यातरी एका आजारातून नुकतेच बरे होऊन भारतात आले होते. मला अजूनही आठवतंय मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या दोन्हीही नाकपुड्यां मधे ऑक्सिजनच्या नळ्या घातल्या होत्या आणि त्या अवस्थेत देखील हा माणूस बेड वर बसून मस्त पैकी द्राक्ष मटकवंत होता. मी गेल्यावर माझं अगदी दिलखुलासपणे स्वागत करत आणि मलाही द्राक्ष ऑफर करत एकेकाळी फिल्म इंडस्ट्री गाजवलेला हा हरहुन्नरी कलाकार मस्त पैकी मांडी ठोकून माझ्याशी गप्पा मारत होता. खरंतर त्यांची ती अवस्था बघून मलाच कसंस होत होत पण ह्या माणसाचा मिष्कील पणा त्या अवस्थेतही टीकलेला बघून मीच थक्क झालेलो.
माझ्या ह्या उपग्रहगीरी मुळे मी बरंच शिकलो. मुख्य म्हणजे न्यूनगंड नावाचा राक्षस पाय लावून कधी पळाला ते कळलंच नाही थोडक्यात मी बऱ्यापैकी निर्लज्ज झालो होतो. 😌

-९-

खय्याम साहब को गुस्सा क्यू आता है ?

उपग्रहगिरीचा माझा हा उद्योग टाइम्स ला अलविदा करे पर्यंत अव्याहत पणे चालूच होता. पण ह्या सर्वांमधलं मेमोरेबल आणि आणि माझ्या कायम लक्षात राहील होतं ते शूट म्हणजे म्युझिक डायरेक्टर श्री. खय्याम साहेबां बरोबरचं.
नेहमी प्रमाणे फिल्म फेअरचे एडिटर श्री. खालिद ह्यांनी मला म्युझिक डायरेक्टर खय्याम साहेबांच्या शूटचं ब्रिफींग दिलं. खय्याम साहेबांचा interview आधीच झालेला असल्याने मला जाऊन फक्त त्यांचे काही फोटोज घ्यायचे होते. ब्रिफींग झाल्यावर मी नेहमी प्रमाणे त्यांना फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन वेळ ठरवली. जुहूला त्यांचा घरीच आमची भेट ठरली होती.
खय्याम साहेबांचं नाव अर्थातच मी असंख्य वेळा रेडिओ वर ऐकलं होतं. त्यांची गाणीही मी अनेकदा ऐकलेली होती पण कुणी विचारलं असतं की सांग बघू त्यांनी संगीतबद्ध केलेलं एखादं गाणं तर ते मात्र मला पटकन सांगता आलं नसतं. ह्याला कारण म्हणजे माझं पहिल्या पासूनच शब्दांपेक्षा सुरांकडेच माझा ओढा जास्त त्यामुळे एखादं गाणं हे महोम्मद रफींनी गायलंय की किशॊरदांनी की मुकेशनी किंवा ते लता मंगेशकर ह्यांनी गायलंय की आशा भोसलेंनी हे चटकन लक्षात यायचं पण म्युसिक डायरेक्टर्सच्या आभ्यासात मात्र माझी दांडी गुल ह्यायची.
पण खय्याम साहेबांच्या कामा बद्दल माझी जिज्ञासा पुरवायला टाइम्स सारख्या कंपनी मध्ये अनेक लोकं होते त्यामुळे त्यांच्या कामाची भरपुर माहिती मला ऑफिस मधेच मिळाली. त्यांनी संगीत बद्ध केलेल्या कभी कभी, उमराव जान, बाझार, रझिया सुलतान ह्या सारख्या चित्रपटांची नावं ऐकून मला तर ह्या इतक्या महान संगीतकारा बदल माहिती नसावी ह्याची खरोखरीच लाज वाटली. कारण वर नमूद केलेल्या चित्रपटली ही सर्वच गाणी माझी अतिशय आवडती आणि ती तितकीच timeless ही आहेत.
असो! मला त्यांनी दुपारी दोन वाजताची अपॉइंटमेंट दिली होती आणि ठरल्या प्रमाणे वेळेच्या ५ मिनिटं आधीच मी त्यांच्या घरी पोहोचलो. दारावरची बेल दाबल्यावर खुद्द खय्याम साहेबांनीच दरवाजा उघडला. दारात मला एकटयालाच बघून बहुदा त्यांना आश्चर्य वाटलं असावं कारण मी आत शिरल्या शिरल्या शिरल्या त्यांनी मला पहिला सवाल केला,”बाकी के लोग कहाँ है? मी थोड़ा गोंधळलोच. पहिल्यांदा तर मला त्यांचा प्रश्नच कळला नाही. मी परत त्यांना विचारलं,” सर बाकी के लोग मतलब? त्यावर खय्याम साहेब थोड्या आश्चर्यानेच मला म्हणाले, “मतलब आपके लाइट वाले लोग कहाँ है ?”. असं विचारल्यावर मी अगदी सहज पणे म्हणून गेलो की, “सर मै तो daylight में ही शुट करने वाला हूँ। माझ्या ह्या उत्तराने मात्र ते माझ्यावर थेट भडकलेच. ” तुम इतने बड़े मॅगज़ीन के फोटोग्राफर होते हुए भी मुझे बिना लाइट्स के शूट करने कैसे आगए”? मुझे अभी आपके एडिटर के साथ बात करनी है. असं म्हणत त्यांनी चक्क खालिद मुहोम्मद ह्यांना फोनच लावला.
बापरे ! माझ्या पोटात उगीचच गोळा. म्हणजे एखाद्या शूट साठी लाइट्स आणि त्या बरोबर कुठलाही ताफा नाही निव्वळ ह्या कारणासाठी कोणाला अपमानास्पद वाटू शकेल असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्या आधी मी कित्येक सेलेब्सची शूट daylight मध्ये पण केली होती. कारण बरेचदा natural लाइट मधे स्टुडिओ लाईट्स पेक्षाही चांगला result येऊ शकतो. खरंतर ह्या गोष्टी खूप subjective असतात. फोटोग्राफी मध्ये lighting किंवा composition ह्या गोष्टींसाठी कुठलेही ठराविक असे नियम कधीही नसतात. म्हणजे एखाद्या personality चा फोटो हा त्या व्यक्तीची स्टोरी visual फॉर्म मधे सांगण्यासाठी सक्षम असला म्हणजे झालं मग तो daylight मधे शूट केला आहे की स्टुडिओ लाइट्स मधे त्याने काहीच फरक पडत नाही.
बोलल्या प्रमाणे त्यांनी आमच्या एडिटर साहेबांकडे माझी जवळ जवळ शिकायतच केली. थोड्यावेळ त्या दोघांचं बोलणं झाल्यावर समोरून खालिद मोहम्मद ह्यांनी खय्याम साहेबांना मला फोन द्यायला सांगितला. खालिद सरांचा माझ्या वर विश्वास होता. खालिद सर समोरून अगदी शांत पणे मला म्हणाले, राजेश अगर वोह comfortable फील नहीं कर रहे हों तो वापिस आजाओ, लाइट्स वगैरा लेके बाद में वापिस चले जाना. मी हो म्हटलं आणि फोन ठेवला.
माझी शिकायत केल्यावर आता खय्याम साहेब थोडे निवळल्या सारखे वाटत होते. तेवढयात चहा आला आणि मग मी थोडं विषयांतर करायचं म्हणून चहा बरोबर मुद्दामच त्यांच्या कामाचा विषय काढला. त्यांच्या उमराव जान, कभी कभी, रझिया सुलतान ह्या चित्रपटांमधल्या मला आवडलेल्या प्रत्येक सर्वच गाण्यां बद्दल अगदी त्यांच्याशी बोललो. म्हणजे मस्का लावायचा म्ह्णून नाही तर ही सर्वच गाणी माझी खरोखरीच खूप फेव्हरेट होती म्हणून (इनफॅक्ट ती अजूनही आहेत). त्यांनी दिलेल्या संगीताचा माझा इतका अभ्यास बघून आता मात्र खय्याम साहेब माझ्या वर कमालीचे खूष झाले होते. मी एकंदरीतच त्यांचा मूड बघून हळूच शूटचा विषय काढला. म्हटलं सर क्या मेरे plan के अनुसार हम Daylight मे आपके कुछ फोटोज ले सकते है ? आणि पुढे हे देखील सांगितलं की अगर ये फोटज आपको अच्छे नहीं लगे तो मै वापिस आ जाऊंगा! माझ्या ह्या विनंतीला मान देऊन खय्याम साहेब चक्क शूट साठी तयार झाले. मग त्यांच्याच बिल्डिंगच्या टेरेस वर मला एक सुंदर भिंत सापडली. सुकलेल्या शेवाळ्यामुळे त्या भिंतीवर ग्राफिक असा पॅटर्न तयार झाला होता. शेवाळ्याने भरलेल्या त्या पॅटर्न च्याच बैकग्राउंड वर मी खय्याम साहेबांचे काही ग्राफिक style मधे ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढले.
झालं एकंदरीत एका चांगल्या नोट वर खय्याम साहेबांना अलविदाकरून मी बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी results आले माझ्या मते तरी त्या फोटों मध्ये दम होता. एडिटर खालिद सर पण फोटोंवर बेहद्द खुश झाले. मी झालेला प्रसंग त्यांच्या कानावर घातला आणि सुटकेचा निश्वास टाकत त्यांच्या कॅबिन मधून बाहेर पडलो. त्या नंतर चार पाच दिवस झाले तरीही खय्याम साहेबांकडून पुन्हा काही बोलावणं आलं नाही ह्यातच मी खूष होतो…..


ग्रासहॉपर राजेश जोशी / जुलै २०२०