-५-

फिल्मफेअर मधे माझा ‘बेबी’ प्रवेश….

Gentleman मॅगझिन च्या अवघ्या ३ महिन्यांच्या सहवासात मी शम्मी कपूर, शशी कपूर आणि चक्क देव साहेबां सारख्या स्टार लोकांना जवळून बघितलं आणि त्यांचं फोटो सेशन देखील केलं. एवढी एकंच आनंदाची बाब सोडली तर एक फोटोग्राफर म्हणून माझ्या हाताला काहीही लागलं नव्हतं. लौकीकार्थाने Gentleman मधल्या दुसऱ्या घवघवीत अपयशा नंतर पुन्हा मी संधीच्या शोधात असतांनाच पुढच्या १-२ महिन्यांतच मला चक्क टाइम्स ऑफ इंडिया मधून पुन्हा इन हाऊस फोटोग्राफर म्हणून ऑफर आली.
म्हणजे त्याचं झालं असं झालं की मी अगदी नेहमीच्या रुटीन प्रमाणे माझा पोर्टफोलिओ घेऊन फेमिना मॅगझिनच्या त्या वेळच्या एडिटर मिसेस. सत्या सरन ह्यांना भेटायला गेलो होतो. सहज म्हणून मी खडा टाकून बघितला की जर in-house फोटोग्राफर ची तुम्हांला आवश्यकता असेल तर मला काम करायला आवडेल. मी सहज म्हणून विचारलेली गोष्ट त्यांनी खूपच सिरिअसली घेतली आणि पुढच्या महिन्या भरात अजून काही interviews चे सोपस्कार पूर्ण करून मी चक्क टाइम्स ग्रुपच्या फेमिना मॅगझिनचा official फोटोग्राफर म्हणून appoint झालो .
वयाच्या जेमतेम चोविशीत टाइम्स सारख्या अग्रगण्य संस्थे मधे काम करायला मिळणं ही माझ्यासाठी तसंच माझ्या घरच्यांसाठी देखील फारच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती. इतक्या मोठ्या संस्थे साठी काम करायची माझी पहिलीच वेळ त्यात टाइम्स चा फोटोग्राफर ह्या हुद्यालाही एक वलय असल्याने मी तर बरेच दिवस हवेतंच होतो.
मोठे पणा म्हणून मुळीच नाही पण एक गम्मत म्हणून सांगतो मला पहिल्याच दिवशी त्या वर्षीची मिस इंडिया एशिया पॅसिफिक मिस.मनप्रित ब्रार हीच्या फोटो शूट साठी पाठवलं. मला जॉईन होऊन फक्त एक दिवस झालेला आणि join झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बॉम्बे टाइम्सच्या फ्रंट पेज वर मी काढलेला मनप्रितचा तो फोटो माझ्या नावा सकट छापून आला. फोटो ठिकठाकच होता पण शेवटी तो Bombay Times च्या फ्रंट पेजवर छापून आला होता. अर्थात तो बघून मला आनंदच झाला होता. त्याच दिवशी दुपारी बॉम्बे टाइम्स चे एक अतिशय सिनियर फोटोग्राफर मला आमच्या कॅन्टीनच्या लिफ्ट पाशी भेटले आणि स्वतःहून माझी ओळख करून घेत माझ्या छापून आलेल्या त्या फोटोचं तोंडभरून कौतुक करत मला म्हणाले की,”राजेश, मुझे भी तुम्हारे जैसी commercial फोटोग्राफी सिखनी है”। बापरे! त्यांच्या ह्या वाक्याने मी फार म्हणजे फारच ओशाळलो कारण त्या फोटो मधे खरं सांगायचं तर विशेष असं काहीच नव्हतं. अगदी प्रामाणिक पणे सांगतो की ही करामत १००टक्के माझ्यावर असलेल्या जे. जे. कॉलेजच्या शिक्क्याचीच होती. जे जे चा हा काऱीस्मा पुढे मला माझ्या कॅरियर मध्ये बऱ्याचदा अनुभवायला मिळाला.
नंतर बरेच दिवसांनी मला कळलं की त्याकाळी टाइम्स ग्रुप मधे फोटोग्राफर म्हणून एन्ट्री मिळणं किती कठीण गोष्ट होती ते. त्यामुळेच असेल कदाचित टाइम्स साठी काम करणाऱ्या बऱ्याचश्या फोटोग्राफेर्स ना हा प्रश्न नक्कीच पडला असणार की ह्या कालच्या पोराला इतक्या लहान वयात इतक्या सहज पणे टाइम्स मधे कशी काय एन्ट्री मिळाली.
असो! जरी मी फेमिना मॅगझीन साठी नेमलेला असलो तरीही टाइम्स ग्रुप च्या कुठल्याही पब्लिकेशनचं काम करायला मी बांधील असणार होतो. सुरवातीचे चारपाच महिने माझं काम फक्त फेमिना साठीच चालू होतं. Filmfare ह्या सिने मॅगझिनचं ऑफिस फेमिनाला लागूनच असल्याने तिथल्या स्टाफ बरोबर माझी हळू हळू ओळख वाढत होती. त्या वेळचे Filmfare चे एडिटर श्री. खालिद मुहोम्मद ह्यांनी माझं फेमिना मध्ये छापून आलेलं काम बघून एके दिवशी मला चक्क एक assignment ची ऑफर केली, ती होती प्रख्यात फिमेल कॉमेडियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री बेबी टुणटुण ह्यांच्या बरोबर फोटो सेशन करण्याची. त्यांच्या ऑफर मुळे मला नक्कीच आनंद झाला पण पहिल्यांदा मला आमच्या एडिटर मॅडम सत्या ह्यांची परवानगी घ्यायची होती. पहिल्या काही महिन्यात फेमिना मधला माझा परफॉर्मन्स चांगला असल्याने फार काही आढेवेढे नं घेता त्यांनी माझ्या ह्या Filmfare साठीचच्या त्या पहिल्या assignment साठी होकार दिला.

वयाच्या सत्तरीत देखील बेबी टुणटुण ह्यांच्या मधलं लहान मूल अगदी टुणटुणीत होतं.

बेबी टुणटुण ह्यांना लहान असतांना मी बऱ्याच चित्रपटांमध्ये कॉमेडियन च्या रोल मधे अनेकदा बघितलं होतं पण त्या प्ले बॅक सिंगर म्हणून देखील प्रसिद्ध होत्या ही गोष्ट मात्र मला त्यांना भेटल्यावर कळली.
बेबी टुणटुण ह्यांचा interview आधीच झालेला असल्याने ह्या वेळी मला एकटयालाच त्यांच्या घरी जाऊन त्यांचे फोटो घ्यायचे होते. मला आता स्पष्ट आठवत नाहीये पण वांद्राला का कुठल्यातरी वेस्टर्न सबर्ब मधे त्यांच्या घरीच मी त्यांचं फोटो सेशन केलं होतं. आता इतकंच आठवतंय की त्या वेळी साधारण सत्तरीत असलेल्या बेबी टुणटुण ह्यांनी खूप मिश्किल पणे कॅमेरा face केला होता. बेबी टुणटुण ह्यांचे फोटोज एडिटर खालिद ह्यांना खूप आवडले आणि अशा पद्धतीने Filmfare मधे माझा Baby प्रवेश झाला.

-६-

दादा मुनी, ट्रिपल फाय आणि किशोर दा !

आज आठवलं तरी कधी कधी अजूनही विश्वास बसत नाही की मी टाइम्स मधल्या त्या निव्वळ दोन वर्षांच्या प्रवासात कितीतरी अशा सेलिब्रिटीज ना भेटलो ज्यांना पाहत पाहत मी मोठा झालो होतो. त्यातले काही तर आजही माझे खूप आवडते कलाकार आहेत. त्या सर्वांमधे माझ्या लक्षात राहिले होते ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके आणि हिंदी फिल्म इंडस्ट्री मधले पितामह म्हणून ओळखले जाणारे दादा मुनी अर्थातच श्री. अशोक कुमारजी. मी ज्या वयात त्यांचे चित्रपट बघितले होते तेव्हा ते ऑलरेडी वडीलधाऱ्या रोल्स मध्ये आले होते पण रुपेरी पडद्यावरचा त्यांचा वावर हा इतका जिवंत असे की ही व्यक्ती अभिनय करत नसून आपल्या समोर खरोखरी वावरते आहे असंच वाटे. मग तो ज्वेल थिफ मधला त्यांचा निगेटिव्ह रोल असुदे की शौकीन मधला रंगेल म्हातारा किंवा अगदी त्यावेळची गाजलेली त्यांची पान पराग ची TV ऍड…. प्रत्येक वेळी ह्या माणसाने पडद्यावर निव्वळ चैतन्यच उभं केलं.
अशोक कुमारजींना मला भेटायचा आणि त्यांचे फोटो काढायचा योग आला ते १९९६ मधे त्यांना मिळालेल्या फिल्म फेअरच्या लाइफ टाइम अचिव्ह मेन्ट अवॉर्ड मुळे. निव्वळ शारीरिक वयामुळे दादामुनी त्या वर्षीच्या फिल्म फेअर सोहळ्याला हजर राहू शकले नव्हते त्या मुळे तो पुरस्कार त्यांना त्यांच्या घरी जाऊन बहाल करण्यात आला होता. मला आता फक्त त्यांच्या घरी जाऊन त्या ट्रॉफी सोबत यांचे काही फोटो घ्यायचे होते.
मी सकाळचीच वेळ ठरवून चेंबूर मधल्या त्याच्या निवासस्थानी पोहोचलो. बंगल्याच्या आवारात शिरता शिरताच त्यांचे फोटो काढण्या साठी चांगला लाइट कुठे मिळेल अशी जागा आधीच हुडकून ठेवली होती.
सहसा कोणीही सेलेब्रिटी गेल्या गेल्या तुम्हाला कधीच दर्शन देत नाहीत दर्शन देतात ते त्यांचे मॅनेजर्स पण त्याच्या अगदी उलट अशोक कुमारजी पेपर वाचत drawing room मधेच बसले होते. अशोकजी चहा, सिगारेट आणि त्या बरोबरच्या गप्पांचे चे प्रचंड शौकीन असल्यामुळे मी गेल्या गेल्या आधी त्यांनी मला चहा ऑफर केला आणि मला कंपनी म्हणून पुन्हा एकदा माझ्या बरोबर चहा घेतला. गप्पा इतक्या रंगात आल्या की मी कशासाठी आलोय तेच काही क्षण मी विसरून गेलो. पण मग त्यांना मधेच इंटरप्ट करत मी सर लाइट जाईल ह्या सबबीवर शूट साठी तयार केलं. अर्थात मला हवा तसा लाइट त्यांच्या घराच्या entrance ला असलेल्या लॉबी मधेच येत असल्याने आमचे शूट अवघ्या अर्ध्या तासातच संपले. फोटो सेशन इतक्या लौकर संपल्याच्या आनंदात आता पुन्हा चहा व्हायला हवा आणि तसा तो झाला देखील पण ह्या वेळी मात्र ते चहा प्यायला मला थेट त्यांच्या बेडरूम मधे घेऊन गेले. चहा बरोबर पुन्हा गप्पा चालू झाल्या. मी फिल्म फेअर चा official फोटोग्राफर असल्याने माझा भाव ऑलरेडी वधारलेला त्यात मी सर जे जे स्कूल चा स्टुडंट आहे हे कळल्यावर मग तर काय त्यांच्या लेखी माझा भाव अजूनच वधारला. बोलता बोलता त्यांनी त्यांच्या सवयी प्रमाणे 555 सिगरेटचं पाकीट काढलं आणि स्वतः घेण्या आधी ते माझ्या पुढे धरलं. मी ओशाळून नाही म्हंटलं तसं म्हणाले अरे आर्ट स्कूल मे जाकंर सिगरेट नही पिते हो? आणि पुढे मिश्किल पणे हसत म्हणले …. या कोई दुसरा ब्रँड पिते हो ?
म्हटलं,”नही सर ऐसी कोई बात नही है, बस आपके सामने हिम्मत नही हो रही है ।
मी असं बोलल्यावर त्यांच्या त्या पहाडी आणि तितक्याच निखळ आवाजात हसत स्वतः मस्त पैकी सिगरेट वगैरे लाइट करून आणि सिगरेटचे झुरके घेत घेत पुन्हा माझ्या बरोबर गप्पा मारायला लागले. आमचं गप्पाष्टक चालू असतांना सहज माझं लक्ष त्यांच्या बेडच्या बाजूलाच लावलेल्या आणि हार घातलेल्या एका तसबिरीकडे गेलं. नीट बघितली तर ती फ्रेम साक्षात स्वर्गीय श्री. किशोर कुमार ह्यांची होती. मला अचानक जाणीव झाली की इतक्या वेळ मला एका मित्रा सारखं वागवत माझ्याशी बोलणारी ही व्यक्ती किती उत्तुंग आहे ते आणि दिवंगत किशोर कुमारांबद्दल काय बोलायचं, त्यांच्या असंख्य गाण्यांनी तर आपल्याला इतकं भरभरून दिलं आहे की त्याची गणतीच होऊ शकत नाही आणि नुसतं त्यांच्या गाण्यांमुळेच नाही तर त्यांच्या अभिनया मुळे देखील आज पर्यंत इतकं हसवलंय की जणू काही ही मंडळी म्हणजे जणू देवाने आपल्याला दिलेल्या देणग्याच असाव्यात. ह्या लोकांनी आपल्याला फक्त आणि फक्त आनंदच दिला आहे. त्याची परत फेड करण्यासाठी किती जन्म घ्यावे लागतील ह्याची गणतीच नाही.
त्या ओघातच मग किशोर कुमारांचा विषय चालू झाला. दादा मुनी आता किशोर कुमारांच्या आठवणीत हरवून गेले. एक गुरूतुल्य व्यक्ती दुसऱ्या एका तितक्याच असामान्य व्यक्ती बद्दल माझ्याशी बोलत होते. मी फक्त त्या अविस्मरणीय क्षणांचा साक्षिदार होतो…
खरंच सांगतो मला त्या वेळी काय वाटलं होतं हे शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. म्हणजे हिमालया समोर उभं राहिल्यावर जसं आपल्याला स्वतःच्या छोट्याश्या अस्तित्वा बद्दल जाणीव होते ना तसंच काहीसं…..

– ७ –

‘ शेफ ‘ मनीषा कोईराला….

Just imagine….तुम्ही आणि तुमचे काही मित्र तुमच्या कुठल्यातरी एका मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेला आहात आणि ती मैत्रीण कुठेतरी बाहेर गेली आहे म्ह्णून तुम्ही सगळे तिच्या घरात तिची वाट बघत बसले आहात आणि जवळ पास अर्धा पाऊण तास तिची वाट बघितल्यावर अचानक ती मैत्रीण एक भला मोट्ठा टिफिन हातात घेऊन घरात येते आणि तुम्ही काही बोलण्या अगोदरच म्हणते की “अगं किंवा अरे, आज तुम्ही घरी येणार म्ह्णून काही तरी खास बनविन म्हटलं आणि सकाळी उठून बघते तर काय सग्गळा गॅस संपलेला” मग काय… सकाळी शेवटी सगळा स्वयंपाक मग अमुक अमुक त्या एका मैत्रिणीच्या घरी जाऊन आटपला. सक्काळी १० वाजल्या पासून जी गेले होते ती (भिंतीवरच्या घड्याळात दुपारचे ३ वाजलेले दाखवत) आत्ता येते आहे बघ”! “बसा हं मी आलेच”.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गॅस संपणे आणि त्याच दिवशी नेमके पाहुणे येणार असल्याने एखाद्याची (म्हणजे घरातल्या गृहिणीचीच) तारांबळ उडणे ह्या गोष्टीचं इतकं काय कौतुक. ये तो हमारे जैसे मध्यमवर्गीय माणूस के आयुष्य मे नेहमीच घडता है।
बरोबर आहे पण मी सांगितलेल्या वरच्या प्रसंगातली टिफिन घेऊन आलेली ती मुलगी म्हणजे साक्षात मनीषा कोईराला होती. मनिषा कोईराला म्हणजे खामोशी, दिल से, बॉम्बे, 1947 a love story, मन ह्या सारख्या अजरामर सिनेमांची हिरॉइन. आपल्या मादक सौन्दर्याने लाखो दिलों धडकन असलेली मनीषा कोईराला ही त्यात अजून नेपाळच्या पूर्व पंतप्रधानांची नातं. पण हीच मनीषा कोईराला आपण एखाद्या सामान्य मुली सारखी कधी imagine करू शकू…. ? ? ?
पण मी चक्क ह्या अद्भुत प्रसंगाचा साक्षीदार होतो. सिनेमा थिएटर मधल्या त्या साध्या कापडी पडद्याला रुपेरी पडदा का म्हणतात ह्या गोष्टीचा त्या दिवशी मला पुसटसा अंदाज आला. कारण हा रुपेरी पडदा त्यावर झळकणाऱ्या आणि आपल्याला स्वप्नलोकात घेऊन जाणाऱ्या ह्या सर्व तारका मंडळीना मुळी देवत्वच प्राप्त करून देतो. खरं तर ती देखील आपल्या सारखीच हाडा -मासाचीच माणसं असतात पण आपण त्या सर्वांनाच त्यांनी साकारल्या भूमिके सारखेच समजत असतो. म्हणजे हिरो हा चांगला आणि व्हिलन हा वाईट वगैरे वगैरे.
असो! तर मी सांगितलेला हा प्रसंग जरी मनीषा कोईरालाच्याच घरी घडलेला असला तरीही तिच्या घरी येणाऱ्या त्या मित्रां मधला अर्थातच मी एक नव्हतो. तर ते मित्र होते साक्षात श्री. नाना पाटेकर आणि श्री. संजय लीला भन्साळी. अर्थात मी तिच्या घरी एकटा गेलो नव्हतो तर मी फिल्म फेअर मॅगझिनचा सध्याचा एडिटर श्री. जितेश पिल्लाई ह्याच्या बरोबर एक official फोटोग्राफर म्हणून गेलो होतो. अर्थात जितेश हा पहिल्या पासूनच एक निष्णात सिने पत्रकार असल्याने त्याचे बऱ्याच स्टार मंडळींशी अगदी घरोब्याचे संबंध होते म्हणजे अजूनही आहेत. सौन्दर्यखळी मनीषा कोईराला ही त्याच खास दोस्तां पैकी एक असल्या मुळे मनिषाने आल्या आल्या जितेशला hug वगैरे केलं आणि मी बाजूला उभं राहून हे दिव्य दृष्य नुसतंच बघत होतो. जितेश ने मग माझी मनिषा बरोबर ओळख करून दिली. Manisha, “meet Rajesh our photographer & he is here to click your photographs with the trophy (Filmfare trophy)”.

मनिषा कोयराला हिला त्या वर्षीच रिलिज झालेल्या, संजय लीला भन्साळी ह्यांनी डिरेक्ट केलेल्या आणि नानाची प्रमुख भूमिका असलेल्या खामोशी ह्या चित्रपटामधल्या तिच्या भूमिके साठी Best Critics Award मिळालं होतं. पण काही कारणास्तव ती अवॉर्ड फंक्शन साठी येऊ नं शकल्याने मला त्या दिवशी तिला शूट करायचा चान्स मिळाला होता.
फोटो काढायचे आहेत म्हटल्यावर चेहेऱ्यावरून तरी एकंदरीत कोईराला बाईंचा मूड दिसत नव्हता. एक तर इतके महत्वाचे पाहुणे घरात असतांना त्यात पुन्हा फोटो सेशन वगैरे म्हणजे फारच झालं. पण मॅगझिनची deadline असल्याने अगदीच नाईलाजाने ती तिच्या तश्याच विस्कटलेल्या आणि मेकअप नसलेल्या अवस्थेत पोज द्यायला तयार झाली. त्यामुळे माझं ते ‘The मनीषा कोईराला’ बरोबरच ड्रीम शूट अक्षरशः १०-१२ मिनिटात संपलं. आईशप्पथ सांगतो पण तीच्या त्या वेळच्या त्या natural look मधे सुद्धा ती तितकीच सुंदर दिसत होती.
आम्ही म्हणजे जितेश आणि मी तिच्या घरी पोहोचलो तेव्हा मनीषा कुठे तरी बाहेर गेली आहे इतकंच कळलं. पोहोचलो तेव्हा तिथे ऑलरेडी त्या दिवशीचे खास मेहमान दस्तुर खुद्द श्री. नाना साहेब पाटेकर आणि श्री. एस. एल. भन्साळी साहेब तिची वाटच बघत ‘ बसले ‘ होते. नाना त्या दिवशी इंडियन क्रिकेट टीम one day दरम्यान अंगात घालायचे तो निळा T-Shirt परिधान करून आला होता. तिथे त्यांच्या सोबत ऑलरेडी असलेल्या एका जर्नलिस्टने नानाला त्या T-Shirt बद्दल विचारलं असता नाना अगदी सहज म्हणाला, “अरे ये अझर ने मुझे गिफ्ट दिया है। अझर म्हणजे अर्थातच त्यावेळचा आपल्या क्रिकेट टीमचा कॅप्टन ‘अझर उद्दीन’.
असो! तर माझ्या साठी हे सर्व जगच नवीन असल्यामुळे मी आ वासून ह्या सर्व गोष्टीं फक्त ऐकत आणि बघत होतो. लहान पणी एका Drawing कॉम्पिटिशन मधे मी चक्क नानाच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच बक्षिस घेतलं होतं, मला जसा त्याच्याशी बोलायचा चान्स मिळाला तसा तो प्रसंग मी मुद्दामूनच नानाला सांगितला. त्यात पुन्हा मी पण जे जे कॉलेजचा आहे हे कळल्यावर मग तर काय नाना साहेब अजूनच खुश झाले. नाना आमच्या कॉलेजचाच असल्याने जे जे कॉलेज हा नानाच्या अतिशय आपुलकीचा विषय. मी फोर्थ इयर ला असतांना एकदा नाना आमच्या ANNUAL EXHIBITION चा चीफ गेस्ट म्हणून आला होता. तेव्हा देखील तो कॉलेजच्या आवारात शिरल्यावर आमच्या डीनला भेटण्याच्याही आधी चक्क आमच्या कंमर्शियल च्या कॅन्टीन च्या मालकाला म्हणजे रमेश शेटला कडकडून भेटला. Applied Art च्या आमच्या त्या कॅन्टीन चा मालक रमेश शेट हा देखील एक अवलियाच होता. मला आठवतंय सर्व जण नानाला बघायला त्याच्या मागोमाग कॅन्टीन मध्ये शिरले होते. मी देखील त्या गर्दीतून वाट काढत जेव्हा कॅन्टीनच्या दारातून आत डोकाऊन बघितलं तेव्हा नाना चक्क खाली जमिनीवर बसला होता आणि रमेश शेट नानाच्या खांद्यावर डोकं ठेऊन घळा घळा रडत होता. नानाच्या डोळ्यात देखील त्यावेळी अश्रू दाटले होते. अर्थातंच ते गतकाळाच्या आठवांनींनी दाटून आलेले आनंदाश्रू होते.
असो! तर ह्या सर्व मंडळींच्या गप्पा चाललेल्या असतांना आणि आम्ही सर्वच जण मनीषा ताईंची वाट बघत होतो आणि अचानक दारावरची बेल वाजली आणि अखेर मनीषा ताईंचं आगमन झालं. तिच्या मागोमाग तिचा एक नोकर हातात ऍल्युमिनिअमचा एक भलामोठा टिफिन घेऊन आत शिरला. मग मनीषा ताईंनी संपलेल्या गॅसची दर्द भरी कहाणी सगळ्यांना सांगितली. त्यातून कळलं की मनिषा कोईरालाने स्वतः सकाळ पासून राबून त्या दिवशीच्या पाहुण्यांसाठी खास नेपाळी पद्धतीचं जेवण बनवलं होतं.
मग काय आल्याआल्या सगळ्यां बरोबर तीच हाय हॅलो झालं………….
आणि मग …… मग काही नाही rest all is the history as you already know…..

मनीषा कोईराला आणि मुंबईतले प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ. श्री. गोयल एका प्रायव्हेट अवॉर्ड फंक्शन मधे

Beautiful मनीषा…

मनिषा कोईराला चे वरील सर्व फोटो मी त्या नंतर झालेल्या दुसऱ्या एका अवॉर्ड फंक्शन दरम्यान काढलेले आहेत. फिल्मफेअर च्या शूट चे फोटोज लवकरच update होतील.

ग्रासहॉपर राजेश जोशी / जुलै २०२०