-१-

प्री करियलायझेशन! १९९४.

लहान पण पासून चित्रकला चांगली असल्याने आर्ट फील्ड मधेच काहीतरी करणार हे निश्चित होतं पण commercial artist आणि त्यापुढे जाऊन कधी फोटोग्राफर होईन असं आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं. खरं सांगायचं तर स्वप्न होतं आर्किटेक्ट व्हायचं पण १२वी सायन्सला मार्कांनी चांगलाच दगा दिला. अर्थात आर्किटेक्चर हा विषय अजूनही आवडतो पण adverting आणि फाइन आर्ट हे विषय देखील तितकेच आवडतात. जे जे ला Applied Art ला प्रवेश मिळाल्या नंतर काही दिवसांतच फाइन आर्टस् मधलं वातावरण बघून इतका भारावून गेलो होतो की पेन्टिंगलाच जायला हवं होतं असंच वाटू लागलं. पण सेकंड ईयर च्या मे महिन्याच्या सुट्टीत कुतूहल म्हणून डोंबिवलीला श्री. निब्रे सरांकडे फोटोग्राफी शिकायला गेलो आणि करियरचा रस्ता जो बदलला तो बदलालाच.
प्रत्येक कलाकार मग तो पेंटर असूदे किंवा आर्किटेक्ट अथवा कवी किंवा लेखक शेवटी प्रत्येक जण स्टोरीच सांगत असतो. अर्थात आपण काम करतो त्या मध्यमा द्वारे स्टोरी सांगणं ही पातळी गाठे पर्यंत आयुष्य कामी येवू शकतं. त्यामुळे सुरवात ही त्या माध्यमाला समजून घेण्या पासून होते. माझ्या मते त्यालाच ‘स्ट्रगल’ असं म्हणतात.
असो! तर जे जे मधून फायनली १९९४ ला पास आऊट झालो आणि एक फोटोग्राफर म्हणून माझ्या करियरची सुरवात झाली.


तब्बल २५ वर्षांची माझ्या करियरची टेप !

मुखपृष्ठावर छाया चित्रित केलेल्या माझ्या सर्व व्हिजीटींग कार्ड्स च्या designs प्रमाणेच मी आणि माझे कलेबद्दलचे विचार हळू हळू बदलत गेले. Sensitivity तीच आहे…. sensibility मात्र थोड्याफार प्रमाणात बदलली. प्रेस फोटोग्राफर ते स्वतंत्र फोटोग्राफर म्हणजेच थोडक्यात Editorial ते advertising असा माझा प्रवास झाला. करियरच्या सुरवातीला Gentleman नावाच्या एका लाइफ स्टाइल मॅगझिन मधून ‘प्रेस फोटोग्राफर’ म्हणून माझ्या करियरची सुरवात झाली. Gentleman हे त्या काळातलं एक प्रसिद्ध लाइफ स्टाइल आणि फॅशन मॅगझिन होतं. करियरच्या सुरवातीला त्यामुळे मला खूप मोठ्या मोठ्या लोकांना भेटायला आणि मुख्य म्हणजे त्यांच्या बरोबर फोटोशूट करायचा चान्स मिळाला. त्या प्रवासात मला आलेल्या कडू गोड अनुभवांचा हा एक छोटासा संग्रह.
२५ वर्षांच्या ह्या प्रवासात अनेक लोकांचं सहकार्य मिळालं पण तरीही एक आर्टिस्ट म्हणून, एक professional म्हणून जो काही प्रवास असतो तो प्रत्येकाचा प्रत्येकालाच करायचा असतो. प्रवासात असंख्य चुका घडल्या. कधी त्यातून शिकलो कधी कधी शिकायला वेळ लागला. फिल्म ते डिजिटल असा हा प्रवास मला खूप काही शिकवून गेला. अर्थात तो प्रवास आणि रोज नविन काहीतरी गोष्टी शिकणं ह्या दोन्हीही गोष्टी आजही चालू आहेत.
पहिलं अपयश ही यशाची पहिली पायरी असते पण म्हणून शंभरावं अपयश ही यशाची शंभरावी पायरी असतेच असं नाही. त्यामुळे कर्मण्ये वाधिकारस्ते ह्या श्लोका मध्ये सांगितल्या प्रमाणे फळाची अपेक्षा नं करता आपलं काम नियमीत पणे करंत राहणे हेच सर्वात उत्तम. कोणीतरी म्हणून गेलं आहे की, “आयुष्याला seriously घेऊ नका पण sincerely जरूर घ्या.
इतकी वर्ष basically तोच प्रयन्त चालू आहे……

ग्रासहॉपर राजेश जोशी / जुलै २०२०

क्रमशः