– २ –

करियर एक चिंतन !

“आयुष्यात मागे वळून बघताना” अशी सुरवात करण्याइतकं माझं वय नक्कीच झालं नाहीये पण परवा सहज मोजलं आणि लक्षात आलं की ह्या वर्षी माझ्या करिअरला तब्बल २५ वर्ष पूर्ण होत आहेत. फायनल इयर च्या Annual प्रोजेक्टला ५-६ awards आणि फर्स्ट क्लास घेऊन १९९४ ला जे जे मधून बाहेर पडलो. माझे प्रोजेक्ट डिस्प्ले वरून उतरवण्याच्या दुसऱ्या दिवशीच माझ्या हातात जॉब होता. त्या वयात छाती फुगायला हे कारण देखील पुरेसं होतं. महिना २००० रुपये पगाराची Nucleus Advertising मधली माझी पहिली नोकरी internship स्वरूपाची असल्याने जेमतेम दोन ते तीन महिने टिकली. Nucleus जाहिरात कंपनीचे फॉऊंडर आणि आयुष्यातले माझे पहिले बॉस श्री.रफिक एलियस हे advertising क्षेत्रातलं एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व. ते निष्णात फोटोग्राफर तर होतेच पण तितकेच उत्कृष्ट कॉपी रायटर म्हणूनही जाहिरात क्षेत्रात प्रसिद्ध होते. BENZER ह्या त्यांच्या मुख्य क्लायंट साठी त्यांनी केलेल्या ads आणि catalogues ना अनेक राष्ट्रीय आणि अतंराष्ट्रीय अवॉर्ड्स मिळाली होती. पण मला आजही ते लक्षात आहेत ते एक अतिशय सुंदर माणूस म्हणून. त्यांच्या त्या दोन-तीन महिन्यांच्या सहवासात माझा एकंदरीतच फोटोग्राफीकडे असलेला कल बघून त्यांनी अगदी मित्रत्वाच्या नात्याने मला सल्ला दिला होता, की राजेश design क्षेत्रात म्हणजेच एखाद्या ad agency मधे वेळ घालवण्या पेक्षा फोटोग्राफी वरच फोकस कर कुठल्यातरी फोटोग्राफर ला assist कर आणि थोड्या दिवसांनी मग हळू हळू freelancing चालू कर. Nucleus सोडली त्या दिवसापासूनच खरंतर करियरची खरी परीक्षा चालू झाली.
कॉलेज सोडतांना आपण कोणीतरी आहोत हा स्वतः बद्दल असलेला माझा गैरसमज पुढच्या दोनतीन महिन्यातच नाहीसा झाला. रफिक सरांनी सांगितल्या प्रमाणे एका अत्यंत नावाजलेल्या फोटोग्राफरला assist केलं देखील पण ते देखील मोजून एक दिवसासाठीच. एका दिवसातल्या त्या काही तासांतच मला कळलं की Assistant ship चं हे गणित आपल्याला झेपणारं किंवा जमणारं नाही. मला पहिल्या पासूनच स्वतंत्र पणे काम करण्याची जास्त आवड त्यामुळेच assistant गीरी करण्या शिवाय स्वतंत्रपणे काम करण्यासाठी कुठला पर्याय आहे? ह्याचा मी शोध घेत असतांनाच माझ्या एका मित्रा कडून एका lifestyle मॅगझिन मधे In-house फोटोग्राफर ची जागा रिकामी असल्याचं कळलं. आणि गम्मत म्हणजे पुढच्या १-२ आठवड्यातच मी चक्क त्या लाइफ स्टाइल मॅगझिन मधे त्याचा स्टाफ फोटोग्राफर म्हणून जॉईन देखील झालो.
कुठल्याही मेंटॉर शिवाय सुरु झालेला हा प्रवास अर्थातच अनेक नागमोडी वळणांनी आणि तितकाच चढ उतारांनीही भरलेला होता. स्वानुभावातून घडत घडत, वाटेत भेटलेल्या अनेक भल्या बुऱ्या माणसांकडून शिकत शिकत success नावाच्या मृगजळाकडे वाटचाल करतांना आजही ते मिळालंय असं मला वाटत नाही आणि अर्थात तसं वाटूही नये.
असो! तर Success बद्दल च्या अनेक व्याख्या आणि अनेक दृष्टिकोन आहेत. पण आपण जेव्हा success ही गोष्ट दुसऱ्या कुणाबरोबर compare करतो तेव्हा त्याचं कमी जास्ती असं मूल्यमापन होतं पण इतक्या वर्षाच्या अनुभवांनंतर मला जेन्युइनली वाटतं की खरी स्पर्धा तर स्वतः सोबतच हवी अर्थात जगात काय चाललंय ह्याचंही भान ठेवून. आपला सूर सापडण्यासाठी किती वर्ष लागतील ह्याचा काही नेम नाही पण इतक्या वर्षांनंतर एक कलाकार म्हणून तुमची काय ग्रोथ झाली हे जास्त महत्वाचं. यश, पैसा आणि कीर्ती ह्या गोष्टी कधी मिळतील (आणि कधी जातील) ह्याचाही काही नेम नाही त्यामुळे जो पर्यंत मी स्वतःशी जिंकत नाही तो पर्यंत ही स्पर्धा संपलीच नाही हा attitude जास्त महत्वाचा.
असो! थोडं विषयांतर झालं तरीही माझ्या अनुभवांच्या पानांमधे काही अशी काही पानं आहेत की जी माझ्या इवल्याश्या आयुष्याच्या संदर्भात विचार केला तर अगदी सुवर्णाक्षरांनी जरी नसली तरीही जतन करून ठेवण्या इतपत नक्कीच आहेत. त्यातल्याच काही glossy पानांचा हा छोटासा संग्रह.

– ३ –

Best Wishes from शम्मी कपूर

साधारण १९९४ च्या ऑक्टोबर महिन्यात मी Gentleman नावाच्या एका Life Style आणि fashion मॅगझीन साठी काम करायला सुरवात केली. आयुष्यातला हा दुसरा जॉब असला तरीही एक फोटोग्राफर म्हणून पहिलाच. आत्ता पर्यंतच्या कॉलेजिय जीवनात स्वतःसाठीच काम करायची सवय असल्याने दुसऱ्या कोणासाठी तरी काम करायची ही माझी पहिलीच वेळ. त्यामुळे माझ्या मॅगझिनच्या एडिटरच्या अपेक्षा समजून घेता घेताच तीन चार महिने गेले आणि त्याआधीच आमच्या एडिटरने माझ्या हातात सोडचिट्ठी ठेवली (ढुंगणावर लाथ मारली म्हणणं नाही म्हटलं तरी अजूनही तसं थोडं जडच जातं). पण ह्या दोन तीन महिन्यात मी सिने आणि कला क्षेत्रातल्या माझ्या अतिशय लाडक्या अशा काही व्यक्तींना भेटलो आणि त्यांच्या बरोबर चक्क फोटो शूट करण्याचीही संधी मला मिळाली.
त्यात सर्वात पहिले होते ते हिंदी फिल्म इंडस्ट्री मधले माझे अतिशय लाडके असलेले श्री. शम्मी कपूर आणि श्री. शशी कपूर. शम्मीजींच्या खानदानी रूपा बरोबरच ते लक्षात राहिले ते त्यांच्या नाचण्याच्या विशिष्ठ style मुळे. त्यांचे जंगली, ब्रह्मचारी, प्रिन्स, जानवर, An Evening in Paris असे अनेक चित्रपट बघून त्यावेळीही मी भारावून गेलो होतो. आश्चर्य म्हणजे ते आजही बघायला मला तितकेच आवडतात. त्यांच्यावर चित्रित झालेली आणि मुहम्मद रफी साहेबांनी त्यांच्या अविट अशा आवाजाने अजरामर केलेली अनेक गाणी हे देखील त्या मागचं एक कारण नक्कीच आहे. श्री. शशी कपूर ह्यांचे फार चित्रपट जरी मी बघितले नसले तरीही त्यांची ती स्टयलिश image, खळ्या पडणारं त्यांचं ते smile ह्या गोष्टी मला आजही प्रिय आहेत.
माझ्या जॉबचा १५ वा दिवस असेल, मला फिरोझा नामक आमच्या एका पारशी sub एडिटरीण बाईंनी अगदी casually सांगितलं की कल हमें शम्मी कपूर और शशी कपूर के साथ शूट करना है। आयुष्यातलं पाहिलं सेलिब्रिटी शूट आणि ते देखील माझ्या इतक्या आवडत्या कलाकारांसोबत, OMG (ओह माय गणपती) माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. हे surprise पण इतक्या suddenly आलं की मला तर पुरतं excite व्हायला देखील वेळ मिळाला नाही. फोटो शूट साठी आम्ही श्री. शम्मी कपूर ह्यांच्या मलबारहीलच्या बंगल्यावर जाणार होतो.
दुर्दैवाने त्या शूटचा एकही फोटो आज माझ्या जवळ नाही पण त्या दिवशीची एक मजेशीर आठवण मात्र आजही माझ्या लक्षात आहे, ती म्हणजे त्यांचा interview चालू असतांना चहा सोबत सर्व्ह केले गेलेले अनेक पदार्थ.
म्हणजे त्याच काय झालं की मी lights वगैरे सेट करून त्या दोघांचा interview म्हणजेच त्यांच्या गप्पा ऐकत बाजूच्या एका सोफ्यावर गपचूप बसलो होतो तितक्यात शम्मीजींची बायको आतून चहाची एक ट्रॉली घेऊन बाहेर आल्या. आणि सर्वांना हाय हॅल्लो करून अतिशय सुबक अशा कपांमध्ये चहा ओतत, आणि कितनी चीनी वगैरे विचारत असतांनाच आतून अजून दोन नोकर आणखीन दोन ट्रॉल्या घेऊन आले. त्या दोन्हीही ट्रॉल्या आकर्षक पणे मांडलेल्या अनेक प्रकारच्या पदार्थांनी अक्षरशः ओसंडून वहात होत्या. बापरे! काय नव्हतं विचारा त्यात! कुकीज, दोन-तीन प्रकारची बिस्किटं, विविध प्रकारची ड्रायफ्रुटस, तीन चार प्रकारचे नमकीन items, विविध पेस्टरिज आणि कमीतकमी तीन ते चार प्रकारची सँडविचेस…….
आज आठवलं की हसू येतं पण माझ्या सारख्या टिपिकल मध्यमवर्गात वाढलेल्या मुलाला चहा बरोबर फारफार तर बिस्किटं इतकच माहित आणि ती पण पारले ग्लुकोज किंवा मारी. बुरबॉन वगैरे म्हणजे तर चैन…. पण मोठ्या लोकांकडचा हा High Tea नामक प्रकार अर्थातच माझ्या साठी नवीनच होता.
मग काय तो नयनरम्य High Tea आणि interview साधारण एखाद तास चालला होता. interview संपला आणि मग पुढच्या अर्ध्या पाऊण तासात मी माझं शूट संपवलं. त्या दोघांमध्ये शशीजी खूपच मीत भाषी होते पण शम्मीजी मात्र तितकेच उत्साही. त्यांनी मला आवर्जून त्यांच्या जवळचा मॅकॅनडॉश म्हणजे सध्याच्या apple कंपनीचा i mac दाखवला होता आणि त्याच्या सोबत एक फोटोहीकाढून घेतला होता. शम्मीजी खूप Tech Savvy होते. त्या आधी मी कॉम्पुटर नामक नुसते चौकोनी डबेच बघितले असल्याने एखाद्या कँडी सारखा दिसणारा अँपल कंपनीच्या तो सुंदर आणि तितकाच नेटका असा तो कॉम्पुटर बघून मी तर पुरता हरखूनच गेलो होतो.
झालं शूट संपवून आम्ही बाहेर आलो आणि आता ही गोष्ट कधी एकदा सगळ्यांना सांगतो असं मला झालं होतं. गम्मत म्हणजे ह्या दोघांबरोबर शूट करणार आहे ही गोष्ट मी मुद्दामच कोणालाही म्हणजे अगदी घरी आई बाबांना देखील सांगितली नव्हती.
शूट संपवून घरी परतत असतांना ट्रेन मधे बाजूलाच बसलेल्या एका माणसाने माझ्या केस वाढलेल्या आणि त्या सोबत अंगावर चढवलेल्या चित्रविचित्र कपड्यांकडे बघत मला कुतूहलाने विचारलं, “Are you an artist”?

एकतर मी already हवेत होतो त्यात त्यांचा तो प्रश्न ऐकला आणि नाक अजून थोडं वर करत आणि ओसंडून चाललेल्या उत्साहात म्हटलं “हो! I am a Press फोटोग्राफर आणि आत्ता मी नुकताच शम्मी कपूर आणि शशी कपूर ह्यांच्या बरोबर शूट करून आलोय.
मनात दाबून धरलेली ही वाक्य तोंडाचा दरवाजा फोडून कधी बाहेर आली ते माझं मलाच कळलं नाही….. आता मला प्रश्न विचारणाऱ्या त्या माणसा बरोबरच गाडीतली अजून एक दोन माणसं पण माझ्याकडे बघायला लागली होती….

श्री. शशी कपूर

– ४ –

जेव्हा मी दुसऱ्यांदा देवाघरी जातो !

असं म्हणतात की मेल्या नंतरच स्वर्ग दिसतो आणि आपली स्वर्गाची कल्पना काय तर साधारण जिथे देव राहतात ती जागा. त्यामुळे ह्याच स्वर्गाच्या कल्पनेला अनुसरून स्वर्गवास अनुभवायचा हा चान्स मला आयुष्यात एकदा सोडून दोनदा मिळाला होता आणि तोही जिवंत पणीच. देवाला भेटल्यावर कुणालाही आनंदच होईल आणि मी तर चक्क ‘देव आनंद’ नां भेटलो होतो तेही एकदा नाही तर चक्क दोनदा.
हे आत्ता मी जितक्या सहजपणे लिहिलंय तितक्याच सहज पणे मला Gentleman Magazine च्या एडिटरिण बाईने सांगितलं होतं, की “उद्या देव आनंद साहेबांना शूट करायचंय”. वर सांगितल्या प्रमाणे गाठीशी अनुभव असा मुळीच नव्हता पण confidence बद्दल विचाराल तर तो मात्र जग जिंकायला निघालेल्या सिकंदर इतका…
सेलिब्रिटी स्टार बरोबर शूट करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या क्राफ्ट मध्येच निपुण असलेलं चालत नाही तर वागण्या बोलण्याची रीत पण तितकीच कळायला हवी. हे किंवा असे बरेच धडे शाळा कॉलेजात कधीच शिकवले जात नाहीत पण तुमचं professionच तुम्हाला ते शिकवतं.
एखाद्या मोठ्या व्यक्ती बद्दल वाटणारी आदरयुक्त भीती ही कधीही योग्यच पण एखाद्याला विनाकारण घाबरून काहीच नं बोलणही बरोबर नाही. माझ्या साठी तर सगळंच नवीन त्यामुळे ज्यावेळेला आमच्या त्या पारशी एडिटरीण बाईंनी मला कॅबिन मधे बोलावून ही गोष्ट सांगितली त्या वेळी मी जवळ जवळ हवेतच उडालेलो.
अरे देव आनंद, मग तो ६० वर्षाचा जरी झालेला असला तरीही तो शेवटी ‘The देव आनंद’ होता. ज्याचे सिनेमे मी आज इतक्या वर्षांनंतर देखील तितक्याच आत्मीयतेने बघतो तो देव आनंद, फिफ्टीज सिक्सटीज मध्ये जो चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जात होता तो देव आनंद. तो जितका मोहोम्मद रफींच्या अजरामर गाण्यांमुळे लक्षात राहिला होता तितकाच त्याच्या देव आनंद style च्या चालण्या आणि बोलण्याने पण. त्यामुळे देव साहेबांना शूट करायला मिळणं ही गोष्ट माझ्या साठी तर आभाळ ठेंगणं करणारीच गोष्ट होती.
थोड्या वेळाने पुन्हा जमिनीवर आल्यावर मी कसं शूट करायचं ह्याचा विचार करायला लागलो. तो जमाना पेजरचा होता, मदतीला Internet काका Google भाऊ कोणीही नसायचं आत्ताच्या काळात मी लगेच reference shots चं dossier बनवलं असतं, त्याच्या स्टयलिस्ट बरोबर एक कॉन्फरेन्स कॉल करून Costumes आणि look decide केलं असतं, लोकेशन्स प्रॉप्स बद्दल discuss केलं असतं……. पण तेव्हा तसलं काहीही नव्हतं. Lights आणि Camera घेऊन मी थेट माझ्या एडिटर बाईं बरोबर देव साहेबांच्या पाली हिलच्या ऑफिस वर जाऊन धडकलो. देव साहेब वेळेचे एकदम पक्के होते त्यामुळे तिथे वेळेच्या बरोब्बर १५ मिनिटं आधीच म्हणजे १० वाजून ४५ मिनिटांनी आम्ही पोहोचलो. बरोब्बर १०.५५ ला देव साहेब हजर झाले. त्यांच्या कॅबिन मधे मग ज्या सोफ्यावर बसून ते interview देणार होते त्याच्या बाजूला मी lights arrange केले, मिटरने Light reading वगैरे घेतलं आणि कॅमेरात रोल भरून फोटो घ्यायला सज्ज झालो. Interview चालू झाला…. मी जमेल त्या अँगल ने फोटो काढायला सुरवात केली. interview चालू असताना फोटो काढायची माझी ही पहिलीच वेळ असल्याने ‘सर जरा कॅमेरात बघा, सर जरा smile करा असल्या instructions मी त्यांना देऊ शकत नव्हतो किंवा interview चालू असतांना मी तश्या सूचना त्यांना देणं हे किती योग्य किंवा अयोग्य असतं हे देखील मला नीटसं माहित नव्हतं.
बरं आमच्या एडिटरीण बाई काय फार friendly कॅटेगरीतल्या नसल्याने त्यांना असल्या शंका येता येता टॅक्सित विचारण्याची पण सोय नव्हती. असो तर तासाभरात interview संपला आणि देव साहेब उठून आपल्या कामाला निघून गेले. मी जेमतेम पाऊण रोल शूट केलेला, मला वाटलं interview संपल्यावर मला शूट साठी अजून पंधरा वीस मिनिट तरी मिळतील पण कसलं काय मला pack up करावं लागलं. मला कळत होतं मला फार काही मिळालेलं नाहीये.
मी ऑफिसला गेल्या गेल्या रोल develop करायला दिला. तासा-दिड तासात results हातात आले आणि मला वाटलेलं तसंच झालं….फोटोज बऱ्या पेक्षाही खालच्या लेव्हलचे होते. portrait काढतांना one to one communication खूप गरजेचं असतं पण हे असलं privilege मला कुठून मिळणार होतं. मी क्षणभरा करता एकदम nervous झालो पण मग ठरवलं की नाही असं करून चालणार नाही, एडिटर बाईंना काय ते खरं सांगून सरळ सरळ देव साहेबांना पुन्हा वेळ देण्याची विनंती करावी. मला माहित होतं की मला आता सॉल्लिड पडणार आहे पण तरीही I decided to take it. मला वाटल्या प्रमाणे एडिटर बाई मला बोल बोल बोलल्या आणि शेवटी माझ्या नशिबाने एकदाचा देव साहेबांच्या त्या सेक्रेटरीचा नंबर मला दिला. आणि जाता जाता तू तुझ्या जबाबदारीवर फोन कर आणि निस्तर अशी ताकीदही दिली.
झालं दुसऱ्या दिवशी अकरा वाजता ठरल्या प्रमाणे फोन लावला आणि झाला प्रकार त्यांच्या सेक्रेटरीला सांगितला आणि निर्लज्जपणे तिला देव साहेबांकडे शब्द टाकण्याची विनंती केली. विचारून सांगते म्हणत तिने माझा फोन होल्ड वर ठेवला आणि २० एक सेकंद झाली असतील आणि माझा माझ्या कानांवर विश्वास बसंत नव्हता कारण समोरून खुद्द देवसाहेब माझ्याशी बोलत होते. अचानक आलेल्या ह्या प्रसंगाने माझी फुल टू फाटली होती. त्या अवस्थेत मी मधेच हिंदी मधेच इंग्लिश अशा थाटात …. Sir interview चालू था इसलिये…. सर मै…..I mean sir….. I couldn’t वगैरे वगैरे असं ….सर – सर करत माझं म्हणणं कसं बसं त्यांना सांगितलं आणि ती वेळ निभावून नेली.
माझी ती नम्र किंवा कळकळीची विनंती बहुतेक त्यांच्या पर्यंत पोहोचली असावी…….फार काही आढे वेढे नं घेता त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी अकरा वाजताची appointment दिली. हुश्श्श! मला दरदरून घाम फुटला होता आता ह्या दुसऱ्या संधीचं सोनं करण्या शिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी त्यांच्याकडे पोहोचून मी ठरवलेल्या plan प्रमाणे त्यांचे फोटो घेतले. ह्यावेळी मात्र चांगले एक दोन रोल शूट केले.
हुश्श्य !!! एकदाचं ते दिव्य पार पडलं. मी तात्काळ रोल्स प्रोसेस केले त्या वेळच्या मानाने फोटो ठीकठाकच आले होते. पण आज जेव्हा ह्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा जाणवतं, की आयुष्यात असा दुसरा चान्स फक्त “देवंच” देऊ शकतो ?

शूट संपल्यावर मी देव साहेबांना Autograph बद्दल विनंती केली. Sure! म्हणत त्यांनी मी दिलेल्या वहीत ऑटोग्राफ दिली आणि आधीच्या पानांवरच्या शम्मी कपूर आणि शशी कपूर ह्यांच्या सह्या आवर्जून न्याहाळत मला वही परत करता करता माझ्याकडे बघून हसत डोळे मिचकावले…… डिट्टो देव आनंद सारखे…. 😊